मुंबई नगरी टीम
मुंबई । राज्यात भ्रष्टाचार मोठ्या प्रमाणावर होत असुन सचिन वाझे तर केवळ हिमनगाचे टोकन आहे,असे अनेक वाझे मुंबई महापालिकेच्या प्रत्येक वॉर्ड ऑफिस मध्ये आहेत. सर्वसामान्य माणूस कष्ट करणार आणि तुम्ही कॅबिन मध्ये बसून त्यांच रक्त पिणार असाल तर हे चालू देणार नाही असा इशाराही आज विधान परिषद विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी दिला. ज्या मुंबईकरांनी ज्यांना महापालिका असो वा मुख्यमंत्रीपदी बसण्याची संधी दिली तेच आज त्याचं सर्वसामान्यांचे रक्त शोषण्याचं काम करत आहेत.सत्ताधा-यांच्या भ्रष्ट कारभारामुळे मुंबईकर जनता प्रचंड त्रस्त झाली असून ही जनताच आगामी निवडणुकीत मुंबईकर सत्ताधा-यांना धडा शिकवतील व त्यांना गाशा गुंडाळावा लागेल असा इशाराही प्रविण दरेकर यांनी आज दिला.
भाजपा दहिसर व मागाठाणे विधानसभा यांच्यावतीने मुंबई महानगरपालिकेच्या आर उत्तर विभाग प्रभाग कार्यालयावर विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांच्या नेतृत्वाखाली धडक मोर्चा काढण्यात आला. याप्रसंगी आमदार मनीषा चौधरी, नगरसेवक हरीश छेडा, नगरसेवक जगदिश ओझा, नगरसेवक जितेंद्र पटेल, मुंबई भाजपा उपाध्यक्ष प्रकाश दरेकर, सचिव उत्तर मुंबई मोतीभाई देसाई, मंडळ अध्यक्ष अरविंद यादव, दिलीप उपाध्याय, वृषाली बागवे,नीलाबेन सोनी, अमर शहा इत्यादि भाजपचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी मंत्रालयातील ३०० अधिकाऱ्यांची बदल्या केल्या आहेत. मंत्रालयातील अनेक अधिकारी वर्षानुवर्षे एकाच विभागात तळ ठोकून होते. ते केवळ खात्यांचे सचिव नव्हे तर कॅबिनेट सदस्यांपेक्षाही अधिक प्रभावशाली झाले असुन त्यांची बदली करण्यात आल्याचे सांगताना दरेकर म्हणाले, आता मुख्यमंत्र्यांनी जरा महापालिकेत सुद्धा लक्ष घालावे. महापालिकेत भ्रष्टाचार होत असून आपण डोळे मिटून दूध पिणार असाल तर हे चालणार नाही. या बाबतही आपण लक्ष घालावे अशी मागणी दरेकर यांनी केली.
दरेकर म्हणाले, वॉर्ड ऑफिस मध्ये एक – दोन वॉर्ड ऑफिसर का राऊंड वर जातात. मग तो घाटकोपरला जाणार, कांदिवलीला जाणार की बाकी गोष्टीकडे लक्ष घालणार. बाकीचे निकृष्ट दर्जाचे आहेत का? एकाच कक्षात वर्षानुवर्षे बसलेले अधिकारी ‘पॉवरफुल्ल’ बनले आहे, त्यांना वाटेल ते करत आहे त्यामुळे आपण याकडे लक्ष घालावे. सर्वसामान्यांसाठी काम करणारे प्रामाणिक कर्तृत्ववान अधिकारी गेले तरी कुठे ? अनेक अधिकारी असे होते ज्यांनी अनेक गोष्टींचा पर्दाफाश केला होता. परंतु आता असलेल्या अधिकाऱ्यांना पदाचा माज आला असुन भ्रष्टाचार वेसण न घालता तेच अधिकारी पदाचा गैरवापर करत भ्रष्टाचार करत असल्याचा आरोप दरेकर यांनी केलाप्रविण भाऊ तुम संघर्ष करो….हम तुम्हारे साथ है…. अशा घोषणा यावेळी कार्यकर्त्यांकडून देण्यात आल्या. यावेळी माहापालिकेमार्फत मुंबई मध्ये होणारा भ्रष्टाचार, अनधिकृत फेरिवाल्यांचा खुले आम वावर, कंत्राटदारांची दादागिरी, त्यांचे फोल आश्वासन कोरोनाला संधी बनवत पालिकेमध्ये झालेल्या भ्रष्टाचाराचा पाढा दरेकर यांनी यावेळी वाचला. दरेकर म्हणाले की, मुंबई महापालिकेत वर्षोनुवर्षे सत्ता उपभोगुनही मुंबईकरांना पिण्याचे पाणी मिळत नाही, आजही चांगले रास्ते द्या अशी वारंवार मागणी करावी लागते. मुंबईकराच्या आशा आकांक्षा पूर्ण करू न शकलेले ठाकरे सरकार मुंबई महानगरपालिकेत अपयशी ठरली आहे केवळ निवडणुकीच्या तोंडांवर आश्वसन देत असुन कोणतेही काम राज्य सरकारकडून झालं नाही. मुंबई महानगरपालिकेच्या २०१७ च्या निवडणूक प्रचाराच्या वेळी ५०० चौ. फुटापर्यंतच्या सर्व सदनिकांना मालमत्ता कर माफ करण्याची घोषणा केली होती. परंतु ते अजूनही झाले नाही. त्यामुळे आश्वासन सुद्धा सत्ताधारी पाळत नाही. एका बाजूला आश्वासन पाळायची नाही आणि दुसऱ्या बाजूला बाळासाहेबांचे वचन पाळणारा पक्ष आहे असे सांगायचे, अशी शिवसेनेची दुटप्पी भूमिका असल्याचे दरेकर यांनी स्पष्ट केले.
मुंबईमध्ये सातत्याने दरडी कोसळण्याचे प्रकार घडत आहेत. चेंबुर विक्रोळी, भांडुप येथे मोठ्या प्रमाणावर दरडी कोसळल्या. याला कोण जबाबदार आहे. महापालिका प्रशासनाचे सर्वसामान्यांच्या सुरक्षेकडे लक्ष नाही. सर्वसामान्य लोकांची, त्यांच्या सुरक्षेची जबाबदारी सत्ताधा-यांची आहे, परंतु त्यातही सत्ताधारी अपयशी ठरले आहेत. कालही घाटकोपर, मालाड येथील लोकांना स्थलांतरित करण्यात आले असुन हे दुर्दैवी आहे असे स्पष्ट करताना दरेकर यांनी सांगितले की, महापालिकेमध्ये सत्ताधा-यांकडून मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार होत आहे. परंतु या संबंधित कोणतीच कारवाई होत नाही. अनधिकृत बांधकाम हे पालिकेचे पैसे कमवण्याचं साधन आहे का ? आज अनधिकृत बांधकामांमुळे अनेक जीव गेले आहे, याला जाबाबदर कोण ? असा सवाल त्यांनी केला.
महापालिकेच्या कारभारामध्ये साखळी निर्माण झाली आहे. पोलिस अधिकारी, महापालिकाचे अधिकारी, लोकप्रतिनिधि याच्या आशिर्वादामुळे अनधिकृत बांधकांविषयी माहिती पुढे येत नाही. हा प्रकार थांबविण्याची आवश्यकता आहे. अन्यथा मुंबईतील अशा अनधिकृत कामांची यादी तयार करुन मुंबईतील महापालिकेच्या ठिकठिकाणच्या नाक्यावर लावून यांचा पर्दाफाश करण्याची असल्याचेही दरेकर यांनी स्पष्ट केले. आजही महापालिकेच्या मॅनहॉल मध्ये माणसं पडत आहे, घाटकोपर येथे महिला मॅनहॉल मध्ये पडली, त्यानंतर पावसात दोन विद्यार्थी मॅनहॉल मध्ये पडले. एवढे गंभीर प्रकार होऊनही महापालिका झोपली आहे का ? साधं झाकणही लावता येत नाहीत. मग महापालिका नेमकं करते ? असा सवाल दरेकर यांनी उपस्थित केला.
लसीकरणबाबत आपण अव्वल ठरल्याबद्दल राज्य सरकार आपली पाठ थोपटून घेत आहे. पण पहिल्या क्रमांकावर येण्यासाठी आपण काय केलं ? एकतरी लस आणलीत का , महापालिकेने ग्लोबल टेंडर काढली, ते टेंडर कुठे गेली, ६ हजार कोटीचा चेक हातात असल्याची फुशारकी आपण मारली मग त्या चेकचे काय केले असा सवाल करतानाच दरेकर म्हणाले की, पंतप्रधान मोदी यांनी लस पुरवठ्याच्या केलेल्या योग्य नियोजनामुळेच आपण प्रथम क्रमांक मिळवू शकलात. तरीही केंद्राच्या नावाने बोट मोडायची अशी दुट्टपी भूमिका राज्य सरकारची आहे अशी टिकाही त्यांनी केली.कोरोनाच्या माध्यमातून भ्रष्टाचाराचे अनेक दार उघडे झाले आहे. १ ते २ कोटीचं कोविड सेंटर १२ कोटीवर येऊन ठेवतात, ऑक्सिजनचा पुरवठा बिल्डर करतात, म्हणजे ऑक्सिजनशी डॉक्टरांचा काही संबंध नाही. जनतेला मारायचा ठेका घेतला आहे का ? मेलेल्या टाळूवरचं लोणी खणायचं काम मुंबई महापालिका व राज्य सरकार करत आहे. ठाणे येथील ग्लोबल रुग्णालयात एकाचवेळी ३००० ते ४०० डॉक्टर यांना काढून टाकण्यात आले. राज्य सरकार एकाबाजुला सांगते डॉक्टरची गरज नाही आणि मग दुसऱ्या बाजूला सांगते तिसरी लाट येणार आहे. मग खरं काय ? कोरोनाची लाट येणार हे खरं असेल तर डॉक्टर नर्स यांना यांना का कमी करत आहात. लोकांना केवळ मूर्ख बनवत असुन यांचा लवकरचं पालिका निवडणुकीत पर्दाफाश करणार असल्याची टीका दरेकर यांनी केली.