मुंबई नगरी टीम
मुंबई । विधानसभा अध्यक्षांची निवडणूक गुप्त मतदान पद्धती ऐवजी आवाजी मतदानाने घेण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.महाविकास आघाडी सरकारच्या या निर्णयाला राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी घटनाबाह्य ठरवल्याने उद्या होणा-या विधानसभा अध्यक्ष निवडणुकीवरून पेच निर्माण झाला आहे.तर दुसरीकडे विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक आवाजी मतदान पद्धतीनेच होईल व उद्याच ही निवडणूक घेण्याचा सरकारचा मानस असल्याचे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी म्हटले आहे.
नाना पटोले यांनी विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यापासून गेली वर्षभर रिक्त असलेल्या विधानसभा अध्यक्षांची निवडणूक ही खुल्या मतदान पद्धती ऐवजी आवाजी मतदानाने घेण्याची शिफारस सरकारने राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडे केली होती.मात्र अध्यक्ष निवडीसाठी आवाजी पद्धतीने मतदान घेण्यास राज्यपालांनी विरोध दर्शवित या निर्णयला घटनाबाह्य ठरवले आहे. राज्यपालांच्या या निर्णयामुळे राज्यातील महाविकास आघाडीला मोठा धक्का बसला असून राज्यपालांच्या या भूमिकेमुळे सरकारसमोर नवा पेच निर्माण झाला आहे.महसूलमंत्री बाळासाहेब थोरात,नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे व अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ यांनी काल राज्यपलांची भेट घेवून निवडणुकीला परवानगी देण्याची विनंती केली होती.त्यावर आज राज्यपालांकडून सरकारला पत्र पाठवून उत्तर कळवण्यात आले आहे.तर विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक आवाजी मतदान पद्धतीनेच होईल व उद्याच ही निवडणूक घेण्याचा सरकारचा मानस आहे. विधिमंडळाने अध्यक्षपदाची निवडणूक आवाजी मतदानाने घेण्याचा जो निर्णय घेतला आहे तो घटनाबाह्य नाही, असे मत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी व्यक्त केले आहे.
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आवाजी मतदानाने निवडणूक घेणे घटनाबाह्य असल्याचे पत्र राज्य सरकारला पाठवले त्यावर आज पटोले यांनी प्रतिक्रिया दिली.नियम बदलण्याचे अधिकार विधिमंडळाला आहेत, त्यानुसार अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठीचे नियम बदल करण्यात आले आहेत. आवाजी मतदानाने अध्यक्षपदाची निवडणूक घेण्याची परंपरा लोकसभेतही आहे तीच प्रक्रिया महाराष्ट्राने स्विकारलेली आहे. इतर राज्यातही तीच परंपरा पाळली जाते. महाराष्ट्रातही विधान परिषद सभापतींची निवडणूक आवाजी पद्धतीनेच होते.त्यामुळे विधिमंडळाने घेतलेला निर्णय घटनाबाह्य नसून तसे पत्र राज्यपालांना पाठवले जाईल असे त्यांनी स्पष्ट केले.राज्यपालांच्या आडून भारतीय जनता पक्ष छुपा अजेंडा राबवत असल्याचे उघड झाले आहे.विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. परंतु राज्यपालांच्या माध्यमातून भाजपा जाणीवपूर्वक यात अडथळा आणत आहे. भाजपा सरकारने लोकसभेत तीन वर्षात उपाध्यक्षपदाची निवडणुक घेतलेली नाही, त्यांचा खरा चेहरा जनतेला माहित आहे, असेही पटोले म्हणाले.