मुंबई नगरी टीम
मुंबई । दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांनी परीक्षा ऑनलाइन घ्यावी या मागणीसाठी राज्यातील विविध भागासह शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांच्या घरोसमोर आंदोलन केले.त्यानंतर शिक्षणमंत्री गायकवाड यांनी आंदोलन करणा-या विद्यार्थ्यांना आवाहन करीत विद्यार्थ्यांच्या हितासाठी परीक्षेचा वेळ वाढवण्यासारखे निर्णय घेणार असल्याची माहिती दिली आहे.
परीक्षा ऑनलाइन पद्धती घेण्याच्या मागणीसाठी दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांनी आज राज्यातील विविध भागात आणि शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांच्या निवासस्थानी आंदोलन केले.या आंदोलनानंतर शिक्षणमंत्री गायकवाड यांनी आंदोलनावर प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.कोरोनामुळे गेल्या दोन वर्षात परिस्थिती बदलली आहे. विद्यार्थ्यांवर सुद्धा करोना आणि परीक्षा असे दुहेरी दडपण असल्याने विद्यार्थ्यांच्या हितासाठी परीक्षेचा वेळ वाढवण्यासारखे निर्णय घेणार असल्याचे गायकवाड यांनी म्हटले आहे.काही विद्यार्थ्यांनी परीक्षा या ऑनलाइन पद्धती घेण्याची मागणी केली आहे तर काही विद्यार्थ्यांनी परीक्षा या ऑफलाइन पद्धतीने घेण्याची मागणी केली आहे.राज्यातील भौगोलिक परिस्थिती पाहता परीक्षा घेण्यात अडचणी येत आहेत.दहावी आणि बारावीच्या परीक्षेस बसणा-या विद्यार्थ्यांची संख्या ३० लाखाच्या आसपास आहे.
विद्यार्थ्यांना या परीक्षेसाठी लांबच्या केंद्रावर जावं लागू नये म्हणून विद्यार्थी ज्या ठिकाणी शिक्षण घेत असलेल्या शाळेतच परीक्षा घेण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे गायकवाड यांनी सांगितले.कोरोनाच्या संकटामुळे आम्हाला विद्यार्थ्यांच्या आरोग्याबाबत कोणतीही धोका पत्करायचा नाही.त्यामुळे कोणताही निर्णय घेण्यापूर्वी तज्ज्ञांशी चर्चा करत असल्याचे गायकवाड यांनी सांगितले. आज विद्यार्थ्यांनी केलेल्या आंदोलनानंतर संबंधित संघटनेच्या प्रमुखांशी चर्चा केली असून,त्यांचे म्हणणे आम्ही ऐकून घेतले आहे.दहावी आणि बारावीच्या परीक्षा लवकर घेण्याचा आमचा प्रयत्न करणार असून,त्यामुळे पुढील वर्गातील प्रवेश लांबणीवर पडणार नाहीत असेही त्यांनी स्पष्ट केले.