मुंबई नगरी टीम
मुंबई । काही लोकांना घेऊन आंदोलनं, निदर्शने केले की प्रसारमाध्यमांत नाव येते.प्रसिद्धी मिळते.पण माझ्यावर बिनबुडाचे आरोप करणारे आपचे धनंजय शिंदे,काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले,भाई जगताप यांच्यावर अब्रूनुकसानीचा दावा मी करणार आहे, असा इशारा विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी दिला.
आपच्या धनंजय शिंदे यांच्या नेतृत्वाखाली विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांच्या कार्यालबाहेर आंदोलन करण्यात आले.त्यासंदर्भात दरेकर प्रसारमाध्यमांशी बोलत होते.ते पुढे म्हणाले की,नाबार्ड, आरबीआयही यावर तपास करत आहे. मी मुंबई बँकेचा चेअरमन १० वर्षे होतो. नाबार्डने एनपीए, सीआरएआर, प्रॉफिट रेशो याचे उत्तम अभ्यास करून गौरवान्वित केले आहे. १५ हजार कोटींचा घोटाळा असणारी बँक २ हजार कोटींचा घोटाळा कुठून करणार. परंतु आरोप करणारे, आणि तो दाखवणारे यांना त्याची सत्यता न पटल्यामुळे असे आरोप होत असतात. यासाठी यंत्रणा आहे, न्याय व्यवस्था आहे. त्यांच्या दरबारी सत्य-असत्य ठरेल. त्यामुळे यांच्या या नौटंकीला मी काडीची किंमत देत नाही. उलट १५ कोटीची बँक २ हजार कोटींचा घोटाळा कसा करेल, असा सवालही दरेकर यांनी उपस्थित केला.
तर इतर जिल्हा मध्यवर्ती बँकांची सीबीआय चौकशीची मागणी करणार
मुंबई मध्यवर्ती जिल्हा बँकेची चौकशी ज्या दहा मुद्द्यांवर झाली त्याच मुद्द्यांवर कोल्हापूर मध्यवर्ती बँक, पुणे जिल्हा मध्यवर्ती बँक,सांगली जिल्हा मध्यवर्ती बँक आणि इतर सर्व मध्यवर्ती जिल्हा बँकांची सीबीआयमार्फत चौकशी करण्यात यावी,अशी केंद्रीय गृहमंत्री आणि सहकारमंत्री अमित शाह यांच्याकडे मागणी करणार आहे,असेही दरेकर यांनी सांगितले.