डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय औषधे दिल्यास मेडीकलचा परवाना कायमस्वरुपी रद्द होणार

मुंबई नगरी टीम

मुंबई । औरंगाबाद शहरातील औषध विक्री दुकानात डॉक्टरांच्या चिकित्सा चिठ्ठीशिवाय गोळ्यांची विक्री होत असल्याबाबत प्रसार माध्यमांमध्ये प्रसारित होत असलेल्या बातम्यांची गंभीर दखल घेतली असून,त्याविरुध्द कडक कारवाई करण्याचे आदेश प्रशासनास दिले आहेत,असे अन्न व औषध प्रशासन राज्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी सांगितले.

काही व्यक्तींकडून नशेसाठी झोपेच्या गोळ्यांची तसेच इतर औषधांची डॉक्टरांच्या चिकित्सा चिठ्ठीशिवाय खरेदी होत असल्याचे औरंगाबाद शहरात निदर्शनास आले होते.त्याअनुषंगाने सह आयुक्त (औषधे), औरंगाबाद विभाग यांना संबंधितावर कडक कारवाईचे आदेश दिले असून प्रशासनाने औषध विक्री दुकानांची तपासणी मोहिम राबवून ज्या ठिकाणी असे प्रकार आढळून येतील त्यांचे परवाने कायमस्वरुपी रद्द करावे.तसेच पोलीस प्रशासनाशी समन्वय साधून कडक कारवाई करण्याच्या सूचनाही राज्यमंत्री यड्रावकर यांनी दिल्या आहेत.अन्न व औषध प्रशासन विभागाकडून औषधे व सौंदर्य प्रसाधने कायदा कायदा राबविला जातो. सदर कायद्यामधील तरतुदीनुसार डॉक्टरांच्या चिकित्सा चिठ्ठीशिवाय वर्गीकृत औषधांची विक्री करणे गुन्हा आहे.अशी विक्री केल्याचे आढळून आल्यास संबंधित आस्थापनेचे परवाने कायमस्वरुपी रद्द होऊ शकतात. तसेच त्यांच्याविरुद्ध गुन्हे दाखल होऊ शकतात. औरंगाबाद विभागात एप्रिल,२०२१ पासून मार्च २०२२ पर्यंत एकूण सात प्रकरणात विना परवाना झोपेच्या गोळ्या,औषधे बाळगणे व विक्री करणे याकरिता पोलीस स्टेशनमध्ये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत,अशी माहिती राज्यमंत्री यड्रावकर यांनी यावेळी दिली.

Previous articleनाना पटोले, धनंजय शिंदे,भाई जगताप यांच्या नौटंकीला मी काडीची किंमत देत नाही
Next articleमोठी बातमी : राज्यात आता मास्क बंधनकारक नाही; कोरोनाचे सर्व निर्बंध हटवले