शिवसेनेच्या लोकांना महाराष्ट्रात दादागिरी करायचे लायसन्स आहे की काय ?

मुंबई नगरी टीम

मुंबई : मुंबई-पुणे एक्सप्रेस-वेवर बंदुकीचा धाक दाखवून ट्रकला ओव्हरटेक करणाऱ्या शिवसैनिकांचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. एमएमएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी यासंदर्भातील व्हिडीओ ट्विटरवर शेअर करत संबंधित शिवसैनिकांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे. असे असतानाच आता भाजपचे नेते निलेश राणे यांनीही शिवसेनवर निशाणा साधला आहे. शिवसैनिकांना महाराष्ट्रात दादागिरी करण्याचे लायसन्स मिळाले आहे का?, असा खोचक सवाल निलेश राणेंनी केला आहे.

निलेश राणे यांनी ट्वीट करत या प्रकारावर संताप व्यक्त केला आहे. “चालत्या गाडीतून पिस्तुल दाखवत दादागिरी, गुंडगिरी करणारे कोण ? चारचाकी गाडीवर शिवसेनेचे स्टिकर, ही घटना पुणे-मुंबई द्रुतगती महामार्गावरील आहे. शिवसेनेच्या लोकांना दादागिरी करण्याचे लायसन्स आहे की काय महाराष्ट्र मध्ये ??”, असा सवाल निलेश राणेंनी केला आहे. इम्तियाझ जलील यांनी काल रात्री हा व्हिडीओ आपल्या ट्विटर अकाऊंटवर शेअर केल्यानंतर एकच खळबळ माजली होती. एका गाडीत दोन व्यक्ती बसल्या आहेत. त्यातील कारचालक हा बंदुकीचा धाक दाखवून ट्रकला ओव्हरटेक करताना दिसत आहेत. महत्त्वाचे म्हणजे या गाडीच्या पाठीमागे शिवसेनेचा लोगो आहे. या व्हिडीओवर अनेकांच्या संतापजनक प्रतिक्रिया यावर उमटत आहेत.

इम्तियाझ जलील यांनीही या प्रकारावर कारवाईची मागणी केली आहे. “हे महाराष्ट्रातील पुणे मुंबई द्रुतगती मार्गावर आहे. वाहनावरील लोगो हे सर्व सांगते. शुक्रवारी रात्री शिवसैनिक त्यांच्या गाडीसाठी मार्गक्रमण करीत असताना रिव्हॉल्व्हर्सचे ब्रँडिंग करीत होते. गृहमंत्री,पोलीस महानिरीक्षक या अधर्मची दखल घेऊ शकतात का ?”, असा प्रश्न जलील यांनी उपस्थित केला आहे. त्यामुळे आता गृहमंत्री यावर कोणती कारवाई करणार हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.

Previous articleराज्यातील मराठा नेत्यांविरोधात शिवसंग्राम आक्रमक, ७ फेब्रुवारीला पुकारणार एल्गार
Next articleदहशतवादी हल्ल्यात वीर मरण आलेल्या पोलिस,लष्करी,निमलष्करी दलातील जवानांच्या पाल्यांना व्यावसायिक अभ्यासक्रमामध्ये प्राधान्य