दहशतवादी हल्ल्यात वीर मरण आलेल्या पोलिस,लष्करी,निमलष्करी दलातील जवानांच्या पाल्यांना व्यावसायिक अभ्यासक्रमामध्ये प्राधान्य

मुंबई नगरी टीम

मुंबई : तंत्र शिक्षण संचालनालयाच्या अखत्यारितील व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी संस्थास्तरीय कोट्यातील व केंद्रीभूत प्रवेश प्रक्रियेच्या रिक्त राहिलेल्या जागांवरील संस्थास्तरावर होणाऱ्या प्रवेशामध्ये दहशतवादी हल्ल्यात वीरमरण आलेल्या पोलिसांच्या पाल्यांना तसेच राज्याचा रहिवाशी असलेल्या आणि दहशतवादी हल्ल्यात वीर मरण आलेल्या लष्करी जवान,निमलष्करी जवान यांच्या पाल्यांना प्रति अभ्यासक्रम जास्तीत जास्त एक जागेवर प्राधान्याने प्रवेश देण्यात येणार आहे.अशी माहिती उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दिली.

सामंत म्हणाले,उच्च व तंत्रशिक्षण विभागाच्या दिनांक २७ फेब्रूवारी २००८ च्या शासन निर्णयानुसार मुंबई येथे आतंकवादी हल्ल्यात शहिद झालेल्या पोलिसांच्या व राज्य शासनाच्या इतर कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांना मोफत शिक्षणाची सुविधा प्रदान करण्याबाबत आदेश निर्गमित करण्यात आलेले आहेत. यानुसार पात्र विद्यार्थ्यांना शिक्षण शुल्काची तसेच इतर शुल्काची प्रतिपूर्ती शासनामार्फत करण्यात येते. देशरक्षणासाठी शहीद झालेल्या शूर व्यक्तींच्या कुटूंबाविषयी सहानुभूती व्यक्त करताना त्यांच्या कुटूंबियांना आर्थिक आधार तसेच योग्य दर्जाचे शिक्षण देण्याची सुविधा उपलब्ध करणे आवश्यक असल्यामुळे अशा शहिदांच्या पाल्यांना तांत्रिक व्यावसायिक पदवी आणि पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमासाठी खाजगी विनाअनुदानीत संस्थांमध्ये संस्थास्तरावरील जागांमध्ये प्राधान्य देण्याची तरतूद आहे. त्याचप्रमाणे महाराष्ट्र राज्याचे रहिवाशी असलेल्या सीमेवर कार्यरत दहशतवादी हल्ल्यात शहिद झालेल्या लष्करी अथवा निम लष्करी जवानांच्या पाल्यांना देखील या निर्णयाचा फायदा होणार आहे. शैक्षणिक वर्ष २०२०-२१ मध्ये व त्यानंतर होणाऱ्या प्रवेशाकरिता हे नियम लागू राहणार आहेत असेही सामंत यांनी सांगितले.

Previous articleशिवसेनेच्या लोकांना महाराष्ट्रात दादागिरी करायचे लायसन्स आहे की काय ?
Next articleसत्य समोर मांडणे महत्त्वाचे,शरद पवारांकडून कृषीमंत्री तोमर यांचा समाचार