भाजपचे लोक काय धुतल्या तांदळाचे आहेत का ? जयंत पाटलांचा रोखठोक सवाल

मुंबई नगरी टीम

रायगड । महाविकास आघाडीचे निवडून आलेले आमदार फोडण्याचा प्रयत्न झाला मात्र ते शक्य झाले नाही म्हणून ईडी,इन्कम टॅक्सची धाड टाकली जात आहे.ईडी काय महाराष्ट्रातच आहे का ? भाजपचे लोक काय धुतल्या तांदळाचे आहेत का ? असा रोखठोक सवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी केला आहे.

आजपासून राष्ट्रवादी परिवार संवाद यात्रेच्या पाचव्या पर्वाला रायगड जिल्ह्यातील उरण विधानसभा मतदारसंघातून झाली.त्यावेळी बोलताना पाटील यांनी भाजपला लक्ष केले. धाडसत्रांना घाबरत नाही म्हणून काही लोक आणखी अस्वस्थ झाले आणि त्यांनी शरद पवार यांच्या घरावर दगडफेकीचा हल्ला घडवून आणला.शरद पवार हे नेहमीच एसटी कामगारांसाठी लढले,त्यांचे म्हणणे ऐकून घेतले मात्र काहींनी एसटी कामगारांना भडकावण्याचा प्रयत्न केला.आझाद मैदानात चिथावणीखोर भाषणे दिली. त्यातून हे घडले असेही पाटील म्हणाले. आता सध्या अटक झालेल्या लोकांची चौकशी सुरू आहे. दुध का दुध पानी का पानी होणारच पण यांच्यावर कडक कारवाई करावी अशी मागणीही पाटील यांनी यावेळी केली.फुले,शाहू,आंबेडकर यांच्या विचारांवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष चालतो.जातीयवादी पक्षांना राष्ट्रवादीच उत्तर देऊ शकते हे लोकांना आता पटले आहे असेही पाटील यांनी स्पष्ट केले. मावळ लोकसभा निवडणुकीत उरणमधून राष्ट्रवादी काँग्रेसला चांगली मते मिळाली. मोदी लाट असताना, पक्ष पहिल्यांदा निवडणूक लढवत असताना पक्षाने एक चांगला निकाल दिला त्याबाबत प्रत्येक कार्यकर्त्याचे पाटील यांनी अभिनंदन केले.

२०१९ साली विधानसभा निवडणुकीचा काळ होता, सर्व नेते सोडून जात होते. पक्ष काही टिकणार नाही, १०-१५ आमदार निवडून येतील असे भाकित केले गेले मात्र आपले नेते पवारसाहेब बाहेर पडले आणि काँग्रेस व राष्ट्रवादीने १०० आमदार निवडून आणले हेही पाटील यांनी सांगितले. चांद्यापासून बांद्यापर्यंत पवारांना मानणारे लोक महाराष्ट्रात आहेत त्याच लोकांनी पवार यांच्यावर विश्वास टाकला आणि राज्यात परिवर्तन झाले हेही आवर्जून पाटील यांनी कार्यकर्त्यांना सांगितले. अदिती तटकरे पालकमंत्री म्हणून चांगले काम करत आहे, आपण तिला साथ द्या. इथे बुथ कार्यकर्ते घडवा, सामान्य नागरिकांचे प्रश्न सोडवा जेणेकरून तो माणूस कायमस्वरूपी राष्ट्रवादीशी जोडला जाईल. प्रशांत पाटील अतिशय चांगले काम करत आहे, मला खात्री आहे ते अधिक मेहनत घेऊन या भागात राष्ट्रवादीचा झेंडा रोवेल असा विश्वास पाटील यांनी व्यक्त केला.

Previous articleपन्नास लाखाच्या घडयाळात टायमिंग चुकलेले आता जागे झाले…भाजपचा सेनेला टोला
Next article‘मी पुन्हा येईन,मी पुन्हा येईन’च्या नादात माझे फोन टॅपिंग;खडसेंचा फडणवीसांवर निशाणा