आरोग्य विभागात १० हजार १२७ जागांसाठी भरती होणार ; जाहिरात आणि परीक्षांची तारीख ठरली !

मुंबई नगरी टीम

मुंबई । ग्रामविकास विभागांतर्गत राज्यातील जिल्हा परिषदांतील आरोग्य विभागाशी संबंधित १० हजार रिक्त पदे तात्काळ भरण्यात येणार असल्याची घोषणा ग्रामविकास मंत्री मंत्री गिरीश महाजन आज केली आहे.त्यानुसार पुढच्या २ महिन्यात आरोग्य विभागाच्या संबंधित १० हजार १२७ जागांची भरती होईल,अशी माहिती गिरीश महाजन यांनी दिली.

त्यासाठी १ जानेवारी ते ७ जानेवारी दरम्यान जाहिरात निघेल तसेच २५ ते २६ मार्च दरम्यान भरती परीक्षा होईल २७ एप्रिल पर्यंत उमेदवारांची निवड प्रक्रिया पूर्ण होईल असे मंत्री महाजन यांनी पत्रकार परिषदेत जाहीर केले आहे.मार्च २०१८ मध्ये राज्यातील जिल्हा परिषदेच्या अतंर्गत आरोग्य विभागाच्या जवळपास १३ हजार जागांसाठीची भरती प्रक्रिया निघालेली होती.यासाठी राज्यातील जवळपास साडेअकरा लाख उमेदवारांनी या साठी आपले अर्ज दाखल केले होते परंतु वाढत्या करोना काळा बरोबरच आरक्षणाच्या अडचणी मुळे तसेच महा-ईपोर्टलच्या रद्द करण्यामुळे ही भरती प्रक्रिया रद्द करण्यात आली होती.गेल्या अनेक दिवसांपासून भरतीचा प्रश्न प्रलंबित होता. युवकांमध्ये मोठ्या प्रमाणावर निराशा होती. सुमारे साडे अकरा लाख विद्यार्थ्यांच्या भविष्याचा प्रश्न होता. त्यांनी परीक्षा शुल्कही भरलं होतं. परंतु विविध कारणांनी परीक्षा झाली नाही.मात्र सत्तेतलं नवं सरकार युवकांच्या भविष्यासाठी आणि कल्याणासाठी कटिबद्ध आहे.त्यानुसार पुढच्या २ महिन्यात आरोग्य विभागाच्या संबंधित १० हजार १२७ जागांची भरती होईल,अशी माहिती गिरीश महाजन यांनी दिली.

पदे कोणती –
या भरतीत आरोग्यसेवकासह,आरोग्य सेविका,पर्यवेक्षक,औषध निर्माता आणि प्रयोगशाळा तंत्रज्ञ या जागांचा समावेश केले.

जाहिरात आणि परीक्षेचे वेळापत्रक-

१ जानेवारी ते ७ जानेवारीदरम्यान भरती प्रक्रियेसाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात येणार आहे. २५ जानेवारी ते ३० जानेवारीदरम्यान अर्जांची तपासणी करण्यात येवून ३१ जानेवारी ते २ फेब्रुवारी दरम्यान वैध ठरलेल्या अर्जांची यादी जाहीर केली जाईल. २५ मार्च आणि २६ मार्च या दोन दिवसांत परीक्षा घेतल्या जातील. २७ मार्च ते २७ एप्रिलपर्यंत निकाल जाहीर करून उमेदवारांची नेमणूक केली जाईल अशी माहिती महाजन यांनी दिली.गेल्या वेळी अर्ज दाखल केलेल्या ज्या उमेदवारांचे वय निघून गेले आहे अशा उमेदवारांना या परीक्षेत सूट देण्यात येणार आहे.

Previous articleभूविकास बँकेच्या कर्जदारांची दिवाळी ; ३४ हजार ७८८ शेतकऱ्यांना ९६४ कोटींची कर्जमाफी
Next articleआगामी काळात भाजपामध्ये अनेक आश्चर्यकारक पक्षप्रवेश : भाजप प्रदेशाध्यक्षांचा गौप्यस्फोट