मुंबई नगरी टीम
मुंबई । सोलापूर,अक्कलकोट व जत तालुक्यातील गावांवर कर्नाटकने हक्क सांगावा हे हास्यास्पद असून कर्नाटकच्या भाजपा सरकारचा हा आगाऊपणा महाराष्ट्र खपवून घेणार नाही. कर्नाटक सीमा वाद अद्याप न्यायप्रविष्ट असताना अशा पद्धतीने महाराष्ट्राच्या गावांवर हक्क सांगणे चुकीचे आहे. शिंदे-फडणवीस सरकारने आधी राज्यातील महत्वाचे प्रकल्प भाजपा शासित गुजरात व मध्य प्रदेशच्या घशात घातले व आता कर्नाटकने महाराष्ट्राच्या गावांवर हक्क सांगणे हे महाराष्ट्राची चोहोबाजूनी गळचेपी करणारे आहे. शिंदे- फडणवीस सरकारने महाराष्ट्राचे तुकडे करण्याची सुपारी घेतली आहे का ? असा संतप्त सवाल काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला आहे.
पटोले यांनी कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्या विधानाचा समाचार घेत राज्यातील शिंदे फडणवीस सरकारवर तोफ डागली.बेळगाव, कारवार, निपाणीचा प्रश्न अजून सुटलेला नसताना सोलापूर, अक्कलकोटसह जत तालुक्यातील ४० गावांवर हक्क सांगून कर्नाटकने कुरापत काढली आहे. सीमावादाचा मुद्दा सुप्रिम कोर्टात असताना भाजपाच्या मुख्यमंत्र्यांनी अशा पद्धतीने वक्तव्य करणे अत्यंत चुकीचे आहे.महाराष्ट्रात पाच महिन्यापूर्वी आलेले शिंदे-फडणवीस सरकार महाराष्ट्राच्या सर्वांगीण प्रगतीत मोठा अडथळा आणणारे आहे. राज्यात गुंतवणूक होत असलेले मोठे प्रकल्प गुजरात व मध्य प्रदेश या भाजपाशासित राज्यांना आंदण दिले, तर राज्यातील पाणीही गुजरातला दिले. महत्वाची कार्यालयेही गुजरातला हलवण्यात आली आता कर्नाटक महाराष्ट्राच्या गावांवर हक्क सांगू लागला आहे, हे राज्यातील सरकार कमजोर असल्यानेच होत आहे. दिल्लीच्या इशाऱ्यावर काम करणाऱ्या शिंदे-फडणवीस यांना सरकार चालवता येत नसून त्यांच्या नाकर्तेपणामुळे महाराष्ट्राचे नुकसान होत आहे.
भाजपाचे नेते व मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी कर्नाटक वादाचे खापर पंडित जवाहरलाल नेहरु यांच्यावर फोडून आपल्या सुमार बुद्धीचे दर्शन घडवले आहे.सर्व गोष्टींना काँग्रेस व पंडित जवाहरलाल नेहरुंना जबाबदार धरून भाजपा आपले अपयश व नाकर्तेपणा झाकत आहे. सरकार म्हणून भाजपा कशाचीही जबाबदारी घेत नाही फक्त वादग्रस्त मुद्दे उकरून काढून जनतेची दिशाभूल करत आहे. जनतेचे मुलभूत प्रश्न हे सरकार सोडवू शकत नाही म्हणूनच असे मुद्दे उपस्थित केले जात आहेत. भाजपाचे हे प्रताप जनतेला आता चांगलेच समजतात पण त्यांचा हा कुटील हेतू साध्य होणार नाही, असेही पटोले म्हणाले.