सरकारवर दबाव टाकण्यासाठी शिवसेनेने पाठिंबा काढावा : खा. अशोक चव्हाण

सरकारवर दबाव टाकण्यासाठी शिवसेनेने पाठिंबा काढावा : खा. अशोक चव्हाण

नांदेड :  राज्यात मराठा आरक्षणासाठी मोठ्या प्रमाणात आंदोलन सुरु आहे पण सरकार मराठा आरक्षणाबाबत गंभीर दिसत नाही. आरक्षणासाठी सरकारवर दबाव वाढवण्यासाठी शिवसेनेसह भाजप सरकारला पाठिंबा देणा-या सर्व पक्षांनी व अपक्ष आमदारांनी सरकारचा पाठिंबा काढून घ्यावा असे आवाहन काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांनी केले आहे.

चव्हाण म्हणाले की, काँग्रेस सरकारने मराठा व मुस्लीम समाजाला आरक्षण दिले होते. भाजप सरकारने या आरक्षणाचे संरक्षण केले नाही. आरक्षणाचा प्रश्न उच्च न्यायालयात गेल्यावर तिथेही आरक्षण टिकावे म्हणून सरकारने प्रयत्न केले नाहीत. सरकारला एक प्रतिज्ञापत्र द्यायला १७ महिने लागले. न्यायालयाच्या आदेशातच सरकारी वकिलांनी अधिकचा वेळ मागितल्याचे न्यायालयाच्या आदेशात नमूद आहे त्यामुळे वेळ मागितलाच नाही हे मुख्यमंत्र्यांचे विधान असत्य होते यावर न्यायालयानेच शिक्कामोर्तब केले आहे. सरकारने मागासवर्गीय आयोगाकडे आरक्षणाचा प्रश्न अगोदरच का सोपवला नाही? आरक्षणाचा प्रश्न मागासवर्गीय आयोगाकडे सोपवल्यावर सरकारने साधे एक पत्र पाठवण्याचे सौजन्य दाखवले नाही. मराठा समाजाचे आंदोलन तीव्र झाल्यावर आयोगाकडे जाण्याचे नाटक सरकारकडून केले जात आहे. मुस्लीम आरक्षणाला तर उच्च न्यायलयाने मंजुरी दिली आहे, पण सरकार जाणिवपूर्वक मुस्लीम समाजाला आरक्षण देत नाही. भाजपची सत्ता आल्यावर पहिल्या कॅबिनेटमध्ये धनगर आरक्षणाचा प्रश्न सोडवू असे आश्वासन देवेंद्र फडणवीस यांनी दिले होते. त्याला आता साडेतीन वर्ष झाली पण धनगर आरक्षणाचा निर्णय झाला नाही. भाजपची मातृसंस्था राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा आरक्षणाला विरोध आहे त्यामुळेच भाजप सरकार मराठा समाजाला आरक्षण देण्यास टाळाटाळ करित आहे असा आरोप खा. चव्हाण यांनी केला.

आरक्षणाच्या मुद्दयावरून काही आमदारांनी राजीनामे दिले आहेत, यात विरोधी पक्षांच्या आमदारांचाही समावेश आहे. सरकारवर अंकुश ठेवण्यासाठी विरोधी पक्षाची आवश्यकता आहे. विरोधी पक्षाच्या आमदारांनी राजीनामे न देता मराठा आरक्षणाचा प्रश्न लावून धरावा. मराठा समाजाला आरक्षण मिळावे अशी सत्ताधारी पक्षाच्या आमदारांची प्रामाणिक इच्छा असेल तर त्यांनी राजीनामे देऊन सरकारवर दबाव वाढवावा असे खा. चव्हाण म्हणाले.

आंदोलकांनीही लोकशाही पध्दतीने शांततामय मार्गाने आंदोलन करावे. शांतता व संयम राखावा. आंदोलन हिंसक होणार नाही याची काळजी घ्यावी. हिंसाचारात सहभाग नसलेल्या अनेक आंदोलक युवक व महिलांवर सुडबुध्दीने गंभीर गुन्हे दाखल करण्यात आले असून त्यांना अटक करण्यात येत आहे. सरकारने निर्दोष तरूणांवर सुडबुध्दीने दाखल केलेले गुन्हे तात्काळ मागे घ्यावेत व त्यांच्या अटकेसाठी सुरु केलेले कोम्बिंग ऑपरेशन थांबवावे अशी मागणी खा. चव्हाण यांनी केली.  समाजाचा संयम सुटत चालला आहे. सरकारने मराठा समाजाच्या संयमाची परीक्षा न पाहता तात्काळ निर्णय घ्यावा असे आवाहन चव्हाण यांनी केले

Previous articleराज्य मागास वर्ग आयोगाचा अहवाल तातडीने राज्य शासनास सादर करा
Next articleसरकार मराठा समाजाला आरक्षण देण्यास तयार : नारायण राणे