सरकार मराठा समाजाला आरक्षण देण्यास तयार : नारायण राणे
मुंबई : मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी सुरू असलेले आंदोलन थांबल्यास आरक्षण देण्यास सरकार तयार आहे असे महाराष्ट्र स्वाभिमानी पक्षाचे अध्यक्ष खा. नारायण राणे यांनी स्पष्ट करीत यासंदर्भात उद्या पुन्हा एकदा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन मराठा समाजाच्या मागण्या मांडणार असल्याची माहिती दिली.
नारायण राणे यांनी येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत मराठा समाजाच्या आरक्षणावर आपली भूमिका मांडली. मराठा समाजाच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर दोन दिवसापूर्वी महाराष्ट्र स्वाभिमानी पक्षाचे अध्यक्ष खा. नारायण राणे यांनी वर्षावर जाऊन मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेतली. सध्या सुरू असलेले आंदोलन थांबल्यास मराठा समाजाला आरक्षण देण्यास सरकार तयार असून, मराठा समाजाच्या नेत्यांचीही भेट घेतल्याचे राणे यांनी सांगितले या भेटीत मराठा समाजाच्या नेत्यांचे म्हणणे ऐकून घेतले, याविषयावर चर्चा करण्यासाठी उद्या पुन्हा एकदा मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेणार असल्याचे राणे यांनी सांगितले. राज्यात मराठा समाजाचे सुरू असलेल्या आंदोलनाला लागलेले हिंसक वळण थांबले पाहिजे, जाळपोळ, तोडफोड यामुळे राज्याचे नुकसान होते आहे. हे थांबले पाहिजे अशी भूमिका मुख्यमंत्र्यांची आहे. येत्या दोन दिवसात मराठा समाजाचे नेते आणि मुख्यमंत्र्यांची भेट घडवून आणून आरक्षणाचा तिढा सोडवण्यास मदत करणार असल्याचे राणे यांनी स्पष्ट केले.










