उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त ठाण्यात विनामूल्य आरोग्य तपासणी शिबीराचे आयोजन
ठाणे (पश्चिम) आणि ठाणे (पूर्व) येथे शनिवार , २८ जुलै आणि रविवार २९ जुलै रोजी दोन दिवसीय विनामूल्य आरोग्य तपासणी शिबीर
ठाणे : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त व शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष तथा मुंबई-ठाणे येथील विविध नामांकित हॉस्पिटल्स तसेच ठाणे शहरातील सर्व डॉक्टर्स संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने ठाणे येथे विनामूल्य आरोग्य तपासणी शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे.
ठाणे पश्चिम येथील सूर्या शिवसेना जनसंपर्क कार्यालय, भवानी चौक, टेंभी नाका येथे शनिवार, २८ जुलै रोजी सकाळी ९ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत विनामूल्य आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच रविवार, दि २९ जून रोजी ठाणे पूर्व येथील मंगला हायस्कुल, कोपरी येथेही सकाळी ९ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत या विनामूल्य आरोग्य तपासणी शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे.
या विनामूल्य आरोग्य तपासणी शिबिरात तज्ज्ञ डॉक्टरांच्या मार्फत सर्व प्रकारच्या आजारावर रुग्णांची तपासणी व निदान करण्यात येणार आहे. निदान झालेल्या रुग्णांना मोफत औषधे त्वरित देण्यात येणार आहे. शिवाय ज्या रुग्णांना शस्त्रक्रिया करणे आवश्यक आहे, अशा रुग्णांची शस्त्रक्रिया मोफत किंवा सवलतीच्या दरात करण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहे.
पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेतून ठाणे येथे बाळासाहेब ठाकरे-शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाची स्थापना करण्यात आली आहे. १७ नोव्हेंबर २०१७ पासून शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाचे काम ठाणे (पूर्व) येथील कोपरी कार्यालयाच्या माध्यमातून सुरू आहे. ठाणे शहर आणि जिल्ह्यातील तसेच महाराष्ट्रातील गंभीर आजाराने ग्रस्त विविध गरजू रुग्णांना शस्त्रक्रियेसाठी व उपचारांसाठी या कक्षाच्या माध्यमातून आर्थिक मदत मिळवूनदेण्यासाठी प्रयत्न केले जातात, तसेच रुग्णांना योग्य मार्गदर्शन करण्यात येते. गेल्या ८ महिन्यांच्या कालावधीत सुमारे १२०० पेक्षा अधिक गरजू रुग्णांना अंदाजे ६ कोटी रुपयांपर्यंतची मदत या वैद्यकीय कक्षाच्या माध्यमातून करण्यात आली आहे.
त्याचेच पुढचे पाऊल म्हणून १ मे रोजी महाराष्ट्र दिन निमित्ताने ठाणे येथे महाआरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.तसेच तीर्थरूप अप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या वाढदिवसानिमित्त १३ मे रोजी कल्याण ( पूर्व ) येथेही महाआरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या दोन्ही महाआरोग्य शिबिरांत मिळून एकूण २० हजार नागरिकांची मोफत तपासणी करण्यात आली असून आजपर्यंत १२०० हुन अधिक शस्त्रक्रिया मोफत करण्यात आल्या आहेत. या सर्व शस्त्रक्रिया महात्मा फुले जन आरोग्य योजना अंतर्गत असलेल्या रुग्णालयात आणि धर्मदाय रुग्णालयात केल्या गेल्या आहेत.
सर्वसाधारण तपासणीपासून हृदयरोग, कर्करोग,त्वचारोग, मेंदू रोग, अवयव प्रत्यारोपण, स्त्रीरोग,मानसिक आरोग्य, ग्रंथींचे विकार, जेनेटिक विकार, मूत्रविकार, नेत्रतपासणी, अस्थिव्यंग,मधुमेह, श्वसनाचे विकार, कान, नाक, घसा,प्लॅस्टिक सर्जरी, दंतरोग, लठ्ठपणा, हार्निया,अॅपेंडिक्स, आतड्याचे विकार, अस्थिव्यंगोपचार,बालहृदयविकार अशा विविध आजारांची तपासणी शिबिरात विनामूल्य करण्यात येणारआहे.
या सर्व प्रकारच्या आजारांवर येथे तपासणी व उपचार केले जाणार असून आयुर्वेदिक औषधोपचारासाठीही स्वतंत्र व्यवस्था असणार आहे. हृदयाला छिद्र असलेल्या बालकांवर देखील या शिबिराच्या माध्यमातून शस्त्रक्रिया केली जाणार आहे. शिबिरात लहान मुलांच्या हृदयाची 2D इको तपासणी होणार नाही, परंतु या शिबिरात 2D साठी विशेष नाव नोंदणी करण्यात येईल. नाव नोंदणी केलेल्या लहान मुलांची ठाणे येथीलच सुप्रसिद्ध हॉस्पिटलमध्ये मोफत 2D इको तपासणी आणि निदान झालेल्या बालकांची मोफत, सवलतीच्या दरात शस्त्रक्रिया करण्यात येतील.
तरी ठाणे महानगरपालिका क्षेत्रातील, कोपरी आणि टेंभी नाका भागातील सर्व नागरिकांनी आपल्या जवळच्या शिवसेना शाखेत प्राथमिक नोंदणी करावी आणि या विनामूल्य महाआरोग्य तपासणी शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन शिवसेना नेते तथा ठाणे जिल्हा पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले आहे.










