पंकजाताईंना एका तासासाठी का होईना मुख्यमंत्री करा….
मुंबई : मराठा आरक्षणावरून पुन्हा एकदा शिवसेनि पक्ष प्रमूख उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे. पंकजा यांना एका तासासाठी का होईना मुख्यमंत्रीपद बहाल केले पाहिजे आणि आरक्षणाची फाईल हातावेगळी केली पाहिजे, असे आजच्या सामनाच्या अग्रलेखातून उद्धव ठाकरे यांनी नमूद करून मराठा आरक्षणामुळे मुख्यमंत्र्यांची झोप उडाल्याचेही त्यांनी म्हटले आहे.
मुख्यमंत्री हे पहाटे तीन–तीन वाजेपर्यंत जागून काम करतात’, असे महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगितलेले खरे असेलही. कारण मराठा क्रांतीने झोप उडवल्यावर जागे राहावेच लागेल आणि पापणी मिटली तर पंकजा मुंडे आरक्षणाच्या फाईलवर सही करतील! म्हणून मुख्यमंत्र्यांनी फाईल कोठे आहे हे शोधून आता तरी फायलीचा लाल दोरा सोडावा व मराठा समाजाची मागणी पुढे न्यावी अशी अपेक्षा अग्रलेखात व्यक्त केली आहे.
मराठा आरक्षणाचे राजकारण होऊ नये व समाधानकारक तोडगा निघायला हवा, असे आज कुणाला वाटत नाही? पंकजा मुंडे यांनी सांगितले आहे, नुसते सांगितले नाही तर शिवरायांची शपथ घेऊन सांगितले आहे की, ‘मराठा आरक्षणाच्या संदर्भातील फाईल माझ्याकडे असती तर मी क्षणाचाही विलंब न लावता आरक्षण दिले असते.’ याचा दुसरा अर्थ असा घेता येईल की, मराठा आरक्षणासंदर्भात फाईल मोकळी करायला सरकारात चालढकल केली जात आहे. मुख्यमंत्री फडणवीस या प्रश्नी एकाकी पडले आहेत काय? असा प्रश्न पडतो. जे पंकजा मुंडे यांना जमू शकते ते फडणवीस यांना का जमू नये? असाही प्रश्न आंदोलकांना आता पडला असेल. मराठा आरक्षणाचा निर्णय पंकजा मुंडे घेऊ शकतात व असे निर्णय घेण्यात कोणतेही अडथळे नसतील तर पंकजा मुंडे यांना एक तासासाठी का होईना, सर्वानुमते मुख्यमंत्रीपद बहाल केले पाहिजे व तेवढी आरक्षणाची फाईल मोकळी केली पाहिजे. पंकजाताईंची भूमिका समजून घेतली पाहिजे. त्या जे बोलत आहेत त्यात राजकारण आहे असे कुणाला वाटत असेल तर ते चुकीचे आहे असे म्हणत उद्धव ठाकरे यांनी पंकजाताई यांची एक प्रकारे पाठराखणच केली आहे.










