मंत्र्यांना कांदे फेकून मारा:राज ठाकरे
नाशिक:मनसे प्रमुख राज ठाकरे सध्या नाशिक दौऱ्यावर आहेत. या दरम्यान कळवण येथे आज कांदा उत्पादकांनी त्यांची भेट घेतली. त्यावेळी राज ठाकरे यांनी मंत्री तुमचे ऐकत नसतील तर त्यांना कांदे फेकून मारा, असे आवाहन केले. राज ठाकरे यांच्या या वक्तव्यावर वाद पेटण्याची शक्यता आहे.
कळवणमध्ये कांदा उत्पादक,स्वाभिमानी संघटनेचे पदाधिकारी यांच्या समवेत राज यांनी चर्चा केली. त्यावेळी कांदा उत्पादकांनी मंत्री आमचे म्हणणे ऐकत नाहीत, अशी तक्रार केली. तेव्हा मंत्री तुमचे ऐतत नसतील तर कांदे फेकून मारा, असा सल्ला राज ठाकरे यांनी दिला. मंत्री बेशुद्ध पडल्यावर तेच कांदे त्यांच्या नाकाला लावा आणि शुद्धीवर आल्यावर पुन्हा कांदे फेकून मारा, असे राज ठाकरे म्हणाले.राज ठाकरे यांनी नंतर मनसे कार्यकर्त्यांशीही संवाद साधला.
राज ठाकरे यांच्या या दौऱ्यात चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे दिसते आहे. दिंडोरी येथे राज ठाकरे यांच्या स्वागताला तरूणांची मोठी गर्दी झाली होती.ढोलताशांच्या गजरात राज यांचे स्वागत करण्यात आले. गर्दी इतकी होती की राज यांना कारमधून उतरायचीही अडचण आली. अखेर पोलिसांनी गर्दी आटोक्यात आणली.
नाशिकमध्ये राज यांनी सुरूवातीपासूनच पक्षबांधणी केली आहे. शिवसेनेत असतानाही राज यांच्याकडेच नाशिक जिल्हा होता. मात्र आता मिळत असलेला प्रतिसाद मतांमध्ये रूपांतरित होतो का, हे पहावे लागेल.











