बीड-परळीतून मुंडे बहिणींना कुणाचा बापही हरवू शकत नाही : जानकर
पुणे: बीड आणि परळीतून प्रीतम मुंडे आणि पंकजा मुंडे यांना कुणाचा बापही हरवू शकत नाही, असे वक्तव्य राज्याचे पशुसंवर्धनमंत्री महादेव जानकर यांनी केले आहे. त्यांची टीका विधानपरिषदेतील विरोधी नेते धनंजय मुंडे यांच्या रोखाने असल्याचे सांगण्यात येते. बीड आणि परळी येथून प्रीतम आणि पंकजा मुंडे मोठ्या फरकाने निवडून येणार, असे ते म्हणाले.
पिंपरी चिंचवड येथे एका कार्यक्रमात ते बोलत होते. ते म्हणाले की, जो कुणी व्हॉट्सअपवर म्हणतोय की मीच निवडून येणार त्याला मी हे चॅलेंज देतो. दोघी जणी मोठ्या फरकाने निवडून येतील. मला कसला स्वार्थ नाही. त्यामुळे मी पंकजाताईंची साथ सोडण्याचे कारणच नाही, असेही ते म्हणाले. यावेळी जानकर यांनी स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांच्या आठवणींना उजाळा दिला. मुंडे यांच्यामुळे आपली राजकीय उंची वाढली. सर्व काही आयते मिळाले. बारामतीत निवडणूक हरलो तर राष्ट्रीय हिरो झालो. ताई तुमचा आशिर्वाद राहू द्या, पुन्हा कुस्ती खेळायची आहे, असे सांगत पुन्हा बारामतीतून निवडणूक लढवण्याचे संकेतही जानकर यांनी दिले.
यावेळी पंकजा मुंडे यांच्यासह आजी-माजी आमदार आणि इतर नेते उपस्थित होते. जानकर यांची सर्व टीका धनंजय मुंडे यांना उद्देश्यून होती. आता धनंजय मुंडे या टीकेला कसे प्रत्युत्तर देतात, याची उत्सुकता राजकीय वर्तुळात आहे.










