मुख्यमंत्री हा शिवसेनेचा व्हावा हीच इच्छा : राऊत

मुख्यमंत्री हा शिवसेनेचा व्हावा हीच इच्छा : राऊत

पंढरपूर: मुख्यमंत्री हा शिवसेनेचाच व्हावा ही आमची इच्छा आहे असे वक्तव्य करीत बोलताना संजय राऊत यांनी जागावाटपाचे सर्व फॉर्म्यूले फेटाळून लावले आहेत.शिवसेना भाजपशी युती करण्यासाठी समान जागांची मागणी करणार असल्याच्या बातम्या माध्यमांमध्ये पसरल्या होत्या. परंतु हे जागावाटप मीडियानेच केले आहे, असे सांगत शिवसेना नेते संजय राऊत यांनी या बातम्या फेटाळून लावल्या.शिवसेनेच्या कोणत्याही नेत्याने किंवा मुखपत्रातून आम्ही तसे काहीही जाहीर केले नाही, असे राऊत म्हणाले.

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आज पंढरपूरमध्ये युतीसंदर्भात महत्वपूर्ण घोषणा करण्याची शक्यता आहे. शिवसेना-भाजपची युती होणार की, नाही या बाबत ही घोषणा असू शकते. यासाठी जागावाटपाची काही सूत्रे समोर आली आहेत. त्यामुळे राऊत यांच्या विधानास महत्व आहे.

संजय राऊत यांनी मात्र हे फॉर्म्युले फेटाळून लावले. महाराष्ट्रात शिवसेनेचा मुख्यमंत्री व्हावा ही आमची इच्छा आहे. आम्हाला शिवसेनेचे राज्य आणायचे आहे. यात चुकीचे काय आहे? असा सवाल त्यांनी केला. मात्र युती होणार की नाही, याबाबत राऊत यांनी भाष्य करण्यास नकार दिला. याबाबतीत निर्णय पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हेच घेतील, असे राऊत यांनी सांगितले.

भाजपकडे शिवसेनेने अर्ध्या जागा लढवायचा प्रस्ताव दिला आहे. शिवसेनेला जागा कितीही दिल्या तरी मुख्यमंत्री शिवसेनेचाच हवा, असा दुसरा एक फॉर्म्युला होता. अशा विविध प्रकारच्या बातम्या माध्यमांत पसरल्या होत्या. राऊत यांनी मात्र हे सर्व फॉर्म्युले फेटाळून लावल्याने पंढरपूरच्या सभेत काय घोषणा होते याकडे राज्याचे लक्ष लागले आहे.

Previous articleबीड-परळीतून मुंडे बहिणींना कुणाचा बापही हरवू शकत नाही : जानकर
Next articleशिवसेनेचे राज्य आणणार म्हणजे आणणारच : उध्दव ठाकरे