पुणे : राज्यातील दिव्यांगांसाठी विशेष क्रिडा संकुल उभारणार अशी घोषणा सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री राजकुमार बडोले यांनी आज येथे केली. पुणे येथील शिवछत्रपती क्रिडा संकुल म्हाळुंगे बालेवाडी स्टेडियममध्ये आयोजित खेलो इंडिया या राष्ट्रीय क्रिडा स्पर्धा कार्यक्रमास त्यांनी भेट दिली. त्यावेळी ते बोलत होते.
खेलो इंडिया या राष्ट्रीय क्रिडा स्पर्धेत देशभरातून २५ राज्यातील १७ आणि २१ वर्षे अशा दोन वयोगटातील ९ हजार खेळाडूंनी भाग घेतला. झालेल्या स्पर्धेतून तब्बल एक हजार खेळाडूंची निवड करण्यात आली. निवड करण्यात आलेल्या या खेळाडूंना आपल्या क्रिडा प्रकारात अधिक प्राविण्य मिळवता यावे अधिक कौशल्य प्राप्त करता यावे यासाठी त्यांना सलग 8 वर्षापर्यंत प्रतिवर्षी ५ लाख रूपये सहाय्यक क्रिडा प्रोत्साहन अनुदान केंद्राकडून देण्यात येईल, असेही बडोले यांनी सांगितले. त्यामुळे खेळांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी आपले करीअर घडवावे, असे आवाहनही त्यांनी केले.
राज्यातील दिव्यांग क्रिडापटूंच्या क्रिडा गुणांना वाव करून देण्यासाठी गेल्यावर्षी २३ ते २५ मार्च दरम्यान गोंदिया जिल्ह्यातील देवरी येथे तीन दिवसीय राज्यस्तरीय दिव्यांग क्रिडा स्पर्धांचे भव्य आयोजन करण्यात आले होते. यावेळी अंध, अस्थिव्यंग, मुकबधिर, मतिमंद तसेच बहुविकलांग खेळाडूंनी गोळाफेक, उंचउडी, लांबउडी, वेट लिफ्टींग, जलतरण, धावणे, ॲथलेटिक्स, बुध्दीबळ, व्हिलचेअर अशा २६ प्रकारच्या क्रिडा प्रकारात भाग घेतला होता. त्यावेळी राज्यभरातून सुमारे तीन हजार दिव्यांग खेळाडूंनी या स्पर्धेत भाग घेतला होता. त्यामुळे विशेष प्रशिक्षण आणि सर्व सुविधांसह क्रिडा संकुल असल्यास दिव्यांग खेळाडू जागतिक पातळीवर विक्रम करू शकतात असा विश्वास बडोले यांनी व्यक्त केला.
सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाची वसतिगृहे आणि आश्रमशाळांमध्येही विद्यार्थ्यांच्या क्रिडा गुणांना वाव आणि प्रोत्साहन देण्यासाठी व्यायामशाळांसोबतच विशेष सुविधा देण्यात येतील, असेही बडोले यांनी पुढे सांगितले.