खडसेंसाठी राष्ट्रवादीची मुक्ताईनगरमधील सभा रद्द ?

मुंबई नगरी टीम

जळगाव : भाजपवर कमालीचे नाराज असलेले ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री एकनाथ खडसे यांच्यासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेसने फिल्डिंग लावल्याची चर्चा आहे.कारण खडसे यांच्या मुक्ताईनगरमध्ये राष्ट्रवादीने अगोदर घोषित केलेली परिवर्तन यात्रेतील सभा अचानक रद्द केली.त्याऐवजी ही सभा आता जामनेरमध्ये होत आहे.

खडसे पक्षांतर करणार याची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात आहे.त्यांनी स्वत:ही कुणी कायम एका पक्षाचा टिळा लावून येत नाही,असे म्हटले होते.त्यामुळे खडसे कॉंग्रेस किंवा राष्ट्रवादीमध्ये जातील,असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीने त्यांच्या भागातील सभा रद्द करणे याला मोठा राजकीय अर्थ आहे.

भाजपवर नाराज खडसेंना आपल्याकडे वळवण्याचे प्रयत्न राष्ट्रवादीने अनेक दिवसांपासून सुरू ठेवले आहेत.अद्याप राष्ट्रवादीने जळगाव लोकसभा जागेवरील उमेदवारही जाहीर केलेला नाही.मंत्रिपदावरून हटवल्यापासून खडसे भाजपवर नेहमी अप्रत्यक्ष टीका करत असतात.मुख्यमंत्र्यांवर ते नेहमीच निशाणा साधत असतात.खडसेंच्या नाराजीचा फायदा उठवण्याचा राष्ट्रवादी प्रयत्न करत आहेत.खडसेंनी लोकसभा निवडणूक लढवणार नाही,असे अगोदरच जाहीर केले आहे.ते तटस्थ राहिले तरीही भाजपला फटका बसू शकतो.शिवाय सून रक्षा खडसे यांना भाजपने पुन्हा उमेदवारी दिली नाही तर खडसे नाराज होऊन पक्षांतर करू शकतात,असा राष्ट्रवादीचा अंदाज आहे.

Previous articleपाच वर्षांपूर्वीची भाषणे ऐका आणि प्रचारासाठी फिरून दाखवा : धनंजय मुंडे
Next articleखासदार  संजय काकडेंना संन्यास घेण्याची वेळ येणार नाही : खोतकर