मुंबई नगरी टीम
हिंगोली : स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांच्या मृत्यूला कोण जबाबदार आहे हे शोधण्याची जबाबदारी आपल्यावर आहे.त्यांची हत्या कशी झाली याची चौकशी व्हावी.त्यामुळे येत्या काळात तुमचं माझं सरकार येणार आहे त्यावेळी गोपीनाथ मुंडे यांच्या हत्येची सखोल चौकशी केली जाईल असे आश्वासन राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांनी वसमतनगर येथिल जाहीर सभेत दिले.
गोपीनाथ मुंडे यांच्या मृत्यूनंतर जे वेगवेगळे मुद्दे समोर येत आहेत त्याबाबत जयंत पाटील यांनी लोकनेत्याचा इव्हीएम प्रकरणात मृत्यू होत असेल तर हे चांगले नाही असेही ते म्हणाले.
नरेंद्र मोदी यांची पाच वर्षे झाली कर्जमाफी देतो सांगून आणि देवेंद्र फडणवीस यांनी धनगर समाजाला आरक्षण देतो सांगून परंतु यांची पहिली कॅबिनेट अद्याप झालेली नाही. या दोघांनाही आता जनतेचा विसर पडला आहे. त्यामुळे यांच्यावर विश्वासच राहिला नाही असा टोलाही आमदार जयंतराव पाटील यांनी लगावला.या देशात शेतकऱ्यांना ऐतिहासिक कर्जमाफी देणारा एकच नेता शरद पवार आहेत परंतु या सरकारने शेतकऱ्यांना फुटकी कवडीही दिली नाही असा आरोपही पाटील यांनी केला.पाच वर्ष झाली काळा पैसा आलेला नाही. या सरकारने फसवलं आहे अशी मानसिकता देशातील जनतेची झाली आहे. हीच जनता आता यासरकारला घरचा रस्ता दाखवल्याशिवाय राहणार नाही असेही प्रदेशाध्यक्ष आमदार जयंतराव पाटील म्हणाले.
भाजपने साडेचार वर्षांत दिलेली आश्वासने पूर्ण केली की नाही याची विचारणा जमलेल्या तमाम जनतेला प्रदेशाध्यक्ष आमदार जयंतराव पाटील यांनी केली. त्यावेळी तमाम जनतेमधून एकच उत्तर ‘नाही’ असे आले. यातून सरकारबद्दल किती संताप आहे यातून दिसले.महाराष्ट्राच्या पापात शिवसेनेचा ५० टक्के वाटा आहे. निव्वळ विरोध करण्याचे काम करत आहेत. जर विरोध करत आहात तर सत्ता का सोडवत नाही असा सवालही आमदार पाटील यांनी केला.पाच राज्यात साम दाम दंड भेद वापरूनही भाजपाचा पराभव झाला आहे त्यामुळे आता विविध प्रकारची आश्वासने द्यायला लागले आहेत असेही पाटील म्हणाले.भाजप सरकार या देशात विकास करण्यात अपयशी ठरली आहे. नोक-या देण्यात अयशस्वी आणि आश्वासनांचे गाजरं दाखवण्यात यशस्वी झाले आहेत.या राज्यात सरकारकडून अघोषित आणीबाणी लागू करण्यात आली आहे असेही पाटील यांनी सांगितले.