आंबेडकरांसोबत आघाडीची बैठक निष्फळ

मुंबई नगरी टीम

मुंबई: भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी महाआघाडीत यावे,यासाठी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण आणि राष्ट्रवादीचे नेते समीर भुजबळ यांनी आज आंबेडकरांच्या राजगृह या निवासस्थानी जाऊन भेट घेतली.चर्चा तब्बल दोन तास सुरू होती.मात्र ही बैठक निष्फळच ठरल्याचे समजते आहे.कारण आंबेडकर आणि प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्या वेगवेगळ्या विधानांवरून समोर येत आहे.

अशोक चव्हाण यांच्याशिवाय विधानपरिषदेचे उपसभापती माणिकराव ठाकरे हेही उपस्थित होते.प्रकाश आंबेडकर आणि एमआयएम यांनी स्थापन केलेल्या वंचित बहुजन आघाडीच्या सभांना चांगला प्रतिसाद मिळत आहे.यामुळे समविचारी मतांची फाटाफूट होण्याची भीती कॉंग्रेसला वाटत आहे.म्हणून अशोक चव्हाण आंबेडकरांना महाआघाडीत येण्याचे आवाहन करत आहेत.आंबेडकरांनी कॉंग्रेसकडून कसला प्रस्तावच आला नाही असे सांगितले. आंबेडकरांच्या वंचित आघाडीला फक्त अकोल्याचीलजागा सोडण्याची तयारी दाखवली आहे.तर आंबेडकरांनी तीन तरीलजागा देण्याचा आग्रह चालवला आहे.त्यामुळे नेते काहीही सांगत असले तरीही आंबेडकरांनी आघाडीत येण्याबाबत काहीही उत्तर दिलेले नाही.

आंबेडकरांनी लोकसभेच्या १२ जागा कॉंग्रेसकडे मागितल्या आहेत.कॉंग्रेसच्या वाट्याला २६ जागा येणार आहेत.त्यातून १२ जागा वंचित आघाडीला गेल्यास कॉंग्रेसची स्थितीच कमकुवत होऊन जाईल.त्यामुळे कॉंग्रेस आंबेडकरांची मागणी मान्य करण्याची शक्यता जवळपास नाहीच.शिवाय एमआयएमची साथ आंबेडकरांनी सोडली पाहिजे,हीही कॉंग्रेसची अट आहे.कट्टर धार्मिक एमआयएमसोबत कॉंग्रेस जाऊ शकत नाही. मात्र आंबेडकरांनी एमआयएमची साथ सोडण्यास नकार दिला आहे.आजच्या बैठकीत महाराष्ट्रातील लोकसभा उमेदवारांची नावे ठरवून यादी दिल्लीला पाठवण्यात येणार आहे.त्यानंतर आंबेडकरांची आघाडी कॉंग्रेस राष्ट्रवादीसोबत जाणार का आणि किती जागा आंबेडकरांना मिळणार,हे स्पष्ट होणार आहे.

Previous articleयुती झाली तरी मी उभा राहणार : अर्जुन खोतकर
Next articleआपला तो बाब्या आणि दुस-यांचं कारटं का ? :  धनंजय मुंडे