मुंबई नगरी टीम
मुंबई: ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी लोकायुक्त नियुक्तीसाठी उपोषण सुरू केले असताना एका वृत्तवाहिनीवरील चर्चेदरम्यान राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी अण्णांनी माझ्याकडे पैसे मागितले होते,असा गंभीर आरोप केला.यामुळे खळबळ उडाली आहे.
अण्णांनी कॉंग्रेस राष्ट्रवादी आघाडी सरकार असताना आंदोलन केले.त्यांच्यावरील खटल्यासाठी वकिलांवर झालेला खर्च त्यांनी माझ्याकडे पैसे मागितले.त्यांचे वकील फुकट काम करत होते.तरीही अण्णांनी माझ्याकडे वकिलावर झालेला खर्च मागितला,असा जोरदार आरोप मलिक यांनी केला. अण्णा हजारे यांच्यावरील चर्चेमध्ये विश्वंभर चौधरी होते.त्यांनी अण्णांवरील आरोप फेटाळून लावले.मलिक यांनी तेव्हाच का तक्रार केली नाही,असे ते म्हणाले.मात्र मलिक आपल्या दाव्यावर ठाम होते.त्यांनी चौधरी यांना माझ्यावर अब्रुनुकसानीचा दावा ठोकण्याचे आव्हानही दिले. अण्णा हे संघाचे एजंट असून निवडणुका आल्या की कुणीतरी त्यांना झोपेतून जागे करते,अशी टीकाही मलिक यांनी केली. मात्र अण्णांनी पैसे मागितल्याचे पुरावे आपल्याकडे असल्याचे ते म्हणाले.हा मुद्दा आता गाजण्याची शक्यता आहे.
आता भाजपविरोधात देशभर वातावरण निर्माण झाले आहे. आमच्यामुळेच सत्तांतर होतेय हे दाखवण्यासाठी अण्णांनी आता उपोषण सुरू केले आहे.हा श्रेय घेण्याचा प्रकार आहे,असे मलिक म्हणाले. अण्णांवर पैशाची अफरातफरी झाल्याचे आरोप सावंत आयोगाच्या अहवालात नमूद केले आहे,अशी आठवण करून दिली.अण्णा संघवादी आहे आणि मी त्यांना गांधीवादी मानत नाही,असेही ते म्हणाले.