युतीसाठी अमित शहांचा उद्धव ठाकरे यांना फोन

मुंबई नगरी

मुंबई: शिवसेनेने कितीही ताठर पवित्रा घेतला तरी भाजप शिवसेनेकडे युतीसाठी आग्रह सोडत नसल्याचे चित्र आहे.भाजप अध्यक्ष अमित शहा यांनी आज पुन्हा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना युतीसाठी फोन केल्याचे समजते.यानंतर भाजप सेनेमध्ये राजकीय हालचाली जोरात वाढल्या आहेत.

अमित शहा यांनी उद्धव ठाकरे यांना फोन करून युतीबाबत लवकरात लवकर निर्णय घ्यावा,असे म्हटल्याचे कळते आहे.समविचारी पक्षांची युती होणे आवश्यक आहे,असे त्यांनी म्हटले आहे.शहा यांच्या या फोननंतर शिवसेना आणि भाजपमध्ये बैठकांचा सिलसिला सुरू झाला आहे.शिवसेनेने विभागवार बैठका बोलवल्या असून त्यात कोकण,मराठवाडा,ठाणे पालघर आदी विभागांच्या बैठकी आयोजित केल्या आहेत. भाजप आणि शिवसेनेत युतीबाबत साराच संभ्रम आहे.मुख्यमंत्री आम्ही युतीसाठी लाचार नाही असे सांगतात तर शहा युतीसाठी उद्धव ठाकरेंना फोन करून गळ घालत आहेत. शिवसेना खासदार संजय राऊत रोज वेगवेगळी विधाने करून गोंधळात भर घालत आहेत,अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे.

दरम्यान,शिवसेनेतही युती व्हावी,असा दबाव वाढत आहे.आमदारांचाही युतीसाठी आग्रह असून अंतिम निर्णय उद्धव ठाकरे यांचा राहील,अशी माहिती गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांनी दिली.आता खरोखर युती होते की स्वबळावर निवडणूक लढवण्याच्या भूमिकेवर शिवसेना ठाम राहते,याची कमालीची उत्सुकता राज्यालाच नव्हे तर देशात आहे.

Previous articleमुख्यमंत्री दुष्काळग्रस्तांसाठी केंद्राकडून भरघोस मदत मिळवण्यात अपयशी : मुंडे
Next articleअण्णा हजारे यांनी माझ्याकडे पैसे मागितले : नवाब मलिक