मुंबई नगरी टीम
मुंबई : तीन राज्यांत भाजपचा पराभव झाल्यानंतर अचानक केंद्रीय महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांचे नाव पंतप्रधानपदाच्या चर्चेत आले. गडकरी यांनीही नेतृत्वाने अपयशाची जबाबदारीही स्वीकारली पाहिजे,असे वक्तव्य करून या चर्चेला हवा दिली. त्यावर आज प्रथमच गडकरी यांनी मौन सोडले. मला कुवतीपेक्षा जास्त मिळाले असून मी पंतप्रधानपदाच्या शर्यतीत नाही,असे गडकरी यांनी स्पष्ट केले.
मात्र त्याचवेळी पंडित नेहरूंच्या चांगल्या कामाचे अनुकरणही केले पाहिजे,असेही गडकरी म्हणाले आहेत.तीन राज्यांमध्ये भाजपचा पराभव झाला तेव्हा मोदी आणि अमित शहा यांच्या नेतृत्वावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते.तेव्हा पंतप्रधान म्हणून गडकरी यांचे नाव सोशल मीडियावर झळकण्यास सुरूवात झाली आणि ही चर्चा सुरू झाली.मात्र इतके दिवस या मुद्यावर मौन बाळगणाऱ्या गडकरी यांनी आता प्रथमच पंतप्रधानपदाच्या स्पर्धेत नाही,असा खुलासा केला आहे.
गडकरी यांनी म्हटले आहे की,माझ्या विधानाचा चुकीचा अर्थ काढण्यात आला.मी जे बोललोच नव्हतो ते माझ्या नावावर चालवण्यात आले.मी कुणाच्याही इशाऱ्यावर काम करत नाही.मी माझ्या मनानुसार भाष्य करत असते,असेही गडकरी यांनी सांगितले.२०१४ च्या तुलनेत भाजपला जास्त जागा मिळतील,असा विश्वासही गडकरी यांनी व्यक्त केला.पुढील पंतप्रधानही मोदीच असतील,असेही त्यांनी म्हटले आहे.