विरोधकांच्या आहारी जावून गावाचे नुकसान करून घेवू नका : पंकजा मुंडे

मुंबई नगरी टीम

परळी : केंद्रात व राज्यात सरकार आमचे,  खासदार, आमदार, पालकमंत्री आम्ही, मग विकास कामांशी तुमचा काय संबंध? असा सवाल करून मी केलेली विकास कामे शाश्वत आहेत, ती २० वर्षे टिकणारी आहेत, त्यामुळे विरोधकांच्या किरकोळ अमिषाला बळी पडून गांवचे नुकसान करून घेवू नका, रावण आणि कौरवांना विजयी करण्याचे पाप करू नका असे आवाहन राज्याच्या ग्रामविकास आणि महिला बालविकास मंत्री  पंकजा मुंडे यांनी आज येथे केले.

मुख्यमंत्री ग्रामीण पेयजल योजनेतून तळेगांव येथे ७६ लाख रुपये खर्चाच्या पाणीपुरवठा योजनेचे लोकार्पण व पांगरी  येथे ८९ लाख रुपयांच्या राष्ट्रीय ग्रामीण पेयजल योजनेचा शुभारंभ  पंकजा मुंडे यांच्या हस्ते आज मोठ्या थाटात पार पडला त्यावेळी त्या बोलत होत्या. प्रारंभी दोन्ही गांवच्या ग्रामस्थांनी सदर योजना मंजूर केल्याबद्दल त्यांचा जाहीर सत्कार करून आभार मानले. यावेळी  पंकजा मुंडे यांनी  ग्रामस्थांशी मनमोकळा संवाद साधला. पुढे बोलतांना त्या म्हणाल्या की, या भागातील जनता वर्षानुवर्षे लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहिली आहे. तुमचे आशीर्वाद आणि त्यांच्या पुण्याईमुळे आम्ही सत्तेत आहोत. या सत्तेचा उपयोग समाजातील प्रत्येक वंचित घटकांना व्हावा यासाठीच मी राजकारणात आलेयं. माझे खाते ग्रामीण जनतेशी निगडीत आहे त्यामुळे शौचालयापासून रस्त्यांपर्यंत सर्व कामे मी केली. महिलांना बचतगटांच्या माध्यमातून स्वावलंबी केले. पाणी पुरवठा योजना कार्यान्वित करून माझ्या माय-माऊलीच्या डोक्यावरील हंडा उतरविण्याचे काम केले. जिल्हा परिषदेच्या निवडणूकीत पराभव झाला तरी प्रत्येक गावांत भरभरून निधी दिला. विरोधी आमदाराला वर्षभरात जेवढा फंड मिळतो तेवढा फंड प्रत्येक गांवच्या सरपंचाला देवून कामे केली. तुमच्या दारात विकास आणलाय त्यामुळे पुढची जबाबदारी आता तुमची आहे.

जिल्हयामध्ये सर्वाधिक पाणीपुरवठा योजना आपण परळी मतदारसंघात आणल्या आहेत. सत्ता आमची, सरकार आमचे, निधी आम्ही दिला मग विकासाशी तुमचा काय संबंध? अशा शब्दांत त्यांनी विरोधकांना ठणकावले, एवढ्या गप्पा मारता तर तेव्हांच का नाही केला विकास? येणारा काळ कसोटीचा आहे. विरोधक तुम्हाला वेगवेगळी अमिषं दाखवतील. दारू पाजणारा मोठा की पाणी पाजणारा हे तुम्हाला ठरवायचे आहे असे त्या म्हणाल्या. मी स्वाभिमानाने राजकारण करते, कुणाच्या दारात जात नाही, मुंडे साहेबांनी तशी शिकवण मला दिली आहे. मी जमिनी गहाण ठेवून ऊस उत्पादकांना पैसे दिले आणि त्यांनी मात्र गरीब शेतक-यांच्या जमिनी लाटल्या. त्यामुळे निवडणूकीत किरकोळ गोष्टीसाठी स्वतःचे इमान विकून गांवचे नुकसान करून घेवू नका असे त्या म्हणाल्या. पांगरीचे माजी सरपंच व ज्येष्ठ नेते विनायक मुंडे यांनी यावेळी भाजपात प्रवेश केला.  पंकजा मुंडे यांना भक्कम साथ देण्यासाठी आपण भाजपात प्रवेश केला असल्याचे त्यांनी सांगितले.  पंकजा मुंडे यांनी त्यांचा सत्कार करून प्रवेशाचे स्वागत केले.

Previous articleमहाराष्ट्रात होणार ‘आंतरराष्ट्रीय रामायण महोत्सव’
Next articleमी पंतप्रधानपदाच्या शर्यतीत नाही : नितीन गडकरी