मुंबई नगरी टीम
मुंबई : शिवसेना आणि भाजपामधिल जागा वाटपावर तोडगा निघाल्याचे समजते. दोन्ही पक्षात झालेल्या समजोत्यानुसार आगामी लोकसभा निवडणुकीत भाजप २५ तर; शिवसेना २३ जागा लढण्याची शक्यता आहे. लोकसभाच्या जागा वाटपासह आगामी विधानसभा निवडणुकीसाठी प्रत्येकी १४४ जागावाटपही अंतिम झाल्याची चर्चा असून,पुढील आठवड्यात यावर शिक्कामोर्तब होईल.भाजपने आपली पालघरची जागा शिवसेनेला सोडली असल्याचे सूत्रांकडून समजते.
शिवसेनेने स्वबळाची घोषणा केल्यापासुन शिवसेना-भाजप एकमेकांवर टीकेची एकही संधी सोडत नव्हते.तर शिवसेनेकडून आणि सामनातुन मुख्यमंत्र्यांना लक्ष्य करण्यात येत होते. त्यामुळे या दोन पक्षात आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत युती होणार की नाही होणार यावर राजकीय वर्तुळात चर्चा सुरु होती.काही मित्र पक्षांनी भाजपची साथ सोडल्याने भाजप युतीसाठी आग्रही आहे. तर गेल्याच आठवड्यात शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे आणि भाजपाध्यक्ष अमित शहा यांच्यात युतीसंदर्भात दुरध्वनीवरून बोलणी झाली असल्याची चर्चा असतानाच दोन दिवसापूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी मातोश्रीवर जाऊन युतीसंदर्भात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा केली. या बैठकीत जागावाटप ठरविण्यात आल्याची चर्चा आहे. तूयानुसार भाजपा २५ तर शिवसेना २३ जागा लढणार असल्याचे समजते. लोकसभेसोबतच विधानसभेच्या जागा वाटपाची चर्चा करण्यात यावी अशी मागणी शिवसेनेने केल्याने विधानसभेसाठी प्रत्येकी १४४ जागांवर लढण्याचे दोन्ही पक्षांचे एकमत झाले असून, पालघरची जागा शिवसेनेला देण्यास भाजपाने सकारात्मक प्रतिसाद दिला असल्याचे समजते.
गेल्या लोकसभा निवडणुकीत बहुमत मिळाल्याने भाजपाने दिलेली दुय्यम वागणूक आणि राज्यात सत्तेत असतानाही शिवसेनेचे खच्चीकरण करण्याची घेतलेली भूमिका यामुळे दुखावलेल्या शिवसेनेने आगामी निवडणुकांसाठी स्वबळाचा नारा दिला होता. त्यानंतर भाजपाने शिवसेनेविरोधात आग्रमक धोरण स्वीकारले होते. मात्र राष्ट्रीय पातळीवर बदललेल्या राजकीय परिस्थितीमुळे भाजपाला दोन पावले मागे घेत शिवसेनेशी युतीसाठी बोलणी करावी लागली होती.हि संधी साधत युतीसाठी राज्यात शिवसेनेचा मुख्यमंत्री करावा अशी अट शिवसेनेने घातल्याने युतीची शक्यता धुसर झाली होती. पुढील आठवड्यात भाजप अध्यक्ष अमित शाह ‘मातोश्री’वर येऊन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेवून युतीवर शिक्कामोर्तब करतील अशी चर्चा आहे