शरद पवारांनी केली माढ्यातून निवडणूक लढविण्याची घोषणा

शरद पवारांनी केली माढ्यातून निवडणूक लढविण्याची घोषणा

मुंबई नगरी टीम

सोलापूर : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यावेळी स्वतः लोकसभा निवडणुकीत उतरणार आहेत. स्वतः पवारांनी आज आपल्या निर्णयाची घोषणा केली. माढा मतदारसंघात ते उभे राहणार आहेत.२००९ मध्येही पवार माढ्यातून लोकसभा निवडणूक लढवून जिंकले होते. नंतर मात्र त्यांनी आपण निवडणूक लढवणार नाही,असे जाहीर केले होते.

राष्ट्रवादीचे अधिकाधिक खासदार निवडून जावेत आणि राष्ट्रीय स्तरावर आपले स्थान मजबूत करावे,हा पवारांचा हेतू असू शकतो. भाजप शिवसेना युती झाल्यावर पवारांनी ही अधिकृत घोषणा केली आहे. युती झाल्याने आघाडीला जास्तीत जास्त जागा मिळवण्यासाठी स्वतः पवारांना रिंगणात उतरावे लागले.

आज पवारांनी पक्षाची बैठक माढा येथे घेतली. दीर्घकाळ विचारविनिमय केल्यानंतर त्यांनी निर्णय जाहीर केला. माढ्याची जागा राष्ट्रवादीचा म्हणण्यापेक्षा मोहिते पाटील घराण्याचा बालेकिल्ला मानला जातो. गेल्या वेळी मोदी लाटेतही विजयसिंह मोहिते पाटील निवडून आले होते. यंदा त्यांच्या उमेदवारीला विरोध झाल्यावर त्यांनीच शरद पवारांना निवडणूक लढवण्याचा आग्रह धरला.माढ्यात राष्ट्रवादीमध्ये अनेक गट असून युतीसमोर टिकाव लागणार नाही,हे चाणाक्ष पवारांनी लगेचच ओळखले.अखेर भाजप शिवसेना युतीनंतर पवार राष्ट्रवादीच्या खासदारांची संख्या वाढविण्यासाठी लोकसभेच्या मैदानात आले आहेत.तत्पूर्वी पवारांनी मतदारसंघातील बबनराव शिंदे यांच्यासह विविध गटात चर्चा करून दिलजमाई घडवण्यासाठी प्रयत्न केले.युती झाली असताना मतभेद परवडणारे नाहीत हे ओळखून पवारांनी आपला पूर्वीचा निर्णय बदलला.

Previous articleतलाठी संवर्गातील १८०० पदांची जाहिरात लवकरच
Next articleशनिवारी धनगर आरक्षणावर शिक्कामोर्तब होणार ?