लाठीमार प्रकरणी  मुख्यमंत्र्यांनी तात्काळ राजीनामा द्यावा : धनंजय मुंडे

लाठीमार प्रकरणी  मुख्यमंत्र्यांनी तात्काळ राजीनामा द्यावा : धनंजय मुंडे

मुंबई नगरी टीम

मुंबई : शिक्षण व रोजगाराच्या मागणीसाठी शांततामय व लोकशाही मार्गाने आंदोलन करणाऱ्या मुकबधिर विद्यार्थ्यांवर अमानुष लाठीमार करुन त्यांना गंभीर जखमी करणाऱ्या सरकारने आपल्या ‘बधिर’तेचे क्रूर दर्शन घडवले आहे. अशा संवेदनशून्य सरकारला सत्तेवर राहण्याचा अधिकार नाही, मुख्यमंत्र्यांनी विद्यार्थ्यांवरील लाठीमाराची जबाबदारी स्विकारुन तात्काळ राजीनामा दिला पाहिजे, अशी मागणी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केली आहे.

पुण्यातल्या समाजकल्याण आयुक्त कार्यालयावर, शांततामय आणि संसदीय मार्गानं आंदोलन करणाऱ्या, मोर्चा काढणाऱ्या मुकबधिर विद्यार्थ्यांच्या मोर्चावर पोलिसांनी केोलेल्या अमानुष लाठीमाराचा  धनंजय मुंडे यांनी तीव्र शब्दात निषेध केला आहे. ते म्हणाले की, ज्यांना ऐकता येत नाही, ज्यांना बोलता येत नाही, अशा मुकबधिर विद्यार्थ्यांच्या मागण्या ऐकून घेण्याऐवजी त्यांच्यावर लाठीमार करुन, त्यांना जखमी करुन, त्यांच्यावर जखमांमुळे विव्हळण्याची वेळ आपल्या सरकारनं आणली. यातून सरकारची क्रूरता दिसली.

सन्मानानं जगण्यासाठी शिक्षण आणि रोजगाराचा अधिकार मूकबधिर बांधवांनाही आहे. शिक्षण, रोजगाराच्या अधिकाधिक संधी मिळाव्यात म्हणून त्यांनी समाजकल्याण आयुक्तलयावर मोर्चा काढला होता. त्यांच्या मागण्या, गावात, जिल्ह्यातंच सोडवल्या गेल्या असत्या तर, मुकबधिर बांधवांना, धुळे, नांदेड, वसमत, नाशिक, नंदूरबार अशा राज्याच्या जिल्ह्याजिल्ह्यातून पुण्यात येण्याची गरज त्यांना पडली नसती, असे  मुंडे म्हणाले.

विद्यार्थ्यांना पोलिस अमानुषपणे मारत असल्याच्या व्हिडिओ क्लिप व्हायरल झाल्या आहेत. मुख्यमंत्र्यांना पोलिसांचं समर्थन करता येणार नाही. पोलिस आणि सरकार म्हणतं की, मुकबधिर विद्यार्थी काय सांगत होते ते आम्हाला कळत नव्हतं आणि आम्ही काय सांगतोय  ते त्यांना कळत नव्हतं. विद्यार्थ्यांशी संवाद साधण्यात आम्हाला अडचण येत होती. त्यातून हा प्रकार घडला. जर सरकारला जनतेची भाषा समजत नसेल आणि जनतेशी संवाद साधण्यात अडचण येत असेल तर या सरकारनं सत्तेवरुन पायउतार झालेलं चांगलं, अशा शब्दात मुंडे यांनी सरकारवर टीका केली आहे.

 

Previous articleराज्यात ४४ लाख बोगस मतदार!
Next articleमहाराष्ट्रात पहिल्यांदा राजकीय पक्षाच्या प्रवक्तेपदी तृतीयपंथी