सर्वसामान्य मुंबईकरांना न्याय देणारी मुंबई बँकेची स्वयं पुनर्विकास योजना
मुंबई नगरी टीम
मुंबई : ‘मुंबई बँकेच्या स्वयं पुनर्विकास योजनेमुळे मुंबईच्या विकासाला नवी दिशा मिळणार आहे. ही योजना अत्यंत सहज, सोपी असून सर्वसामान्य मुंबईकरांना न्याय देणारी आहे,’ असे प्रतिपादन मुंबई शहराचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी केले.
मुंबई जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक आणि मुंबई हौसिंग फेडरेशन यांच्या संयुक्त विद्यमाने गृहनिर्माण संस्थांसाठी वांद्र्याच्या शासकीय वसाहतीमध्ये स्वयं पुनर्विकासावर मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुंबई बँकेचे अध्यक्ष आमदार प्रवीण दरेकर होते. कार्यक्रमास शिवसेना नेते अनिल परब, सहकारातील जेष्ठ नेते शिवाजीराव नलावडे, हौसिंग फेडरेशनचे अध्यक्ष प्रकाश दरेकर, सचिव डी. एस. वडेर, डी एन महाजन, वसंतराव शिंदे, काशिनाथ नाईक, यशवंत सावंत, मुंबई बँकेच्या संचालिका शिल्पाताई सरपोतदार, संचालक नितीन बनकर, जिजाबा पवार, कविताताई देशमुख, भाऊसाहेब पारले, म्हाडाचे कार्यकारी अभियंता दिलीप गरजे, उप निबंधक के. पी. जेबले, प्रसिद्ध आर्किटेक्ट चंद्रशेखर प्रभू, राज्य हौसिंग फेडरेशनचे सीताराम राणे तसेच गृहनिर्माण संस्थांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी महापौरांनी मुंबई बँकेच्या उपक्रमाचे कौतुक केले. तसेच जास्तीत जास्त गृहनिर्माण संस्थांनी या योजनेचा लाभ घ्यायला हवा, असे सांगितले. तर अनिल परब यांनी सांगितले कि, ‘बिल्डरांकडून पुनर्विकास प्रकल्प रखडल्यामुळे अनेक ठिकाणी रहिवाशी रस्त्यावर आले आहेत. अशा बिल्डरांमुळे स्थानिक लोकप्रतिनिधी आणि संस्थांचे पदाधिकारी बदनाम होत आहेत. या समस्येवर मुंबई बँकेने स्वयं पुनर्विकास योजनेचा रामबाण उपाय दिला आहे. सहकाराच्या तत्वानुसार सर्व सदस्यांनी एकत्र येउन ही योजना राबवायची आहे. या योजनेला शासनानेही पाठबळ दिले आहे. त्यामुळे रहिवाशांचे हित साध्य होणार आहेच. शिवाय लोकप्रतिनिधी आणि पदाधिकार्यांनाही दिलासा मिळणार आहे.
मुंबई बँकेच्या स्वयं पुनर्विकास योजनेच्या धर्तीवर राज्य सरकार स्वयं पुनर्विकासाचे धोरण लवकरच जाहीर करणार आहे. त्यामुळे स्वयं पुनर्विकासाला जाणाऱ्या संस्थांना अधिक सवलती मिळतील, प्रोत्साहनपर एफएसआय मिळेल. पण या प्रक्रियेला गती देण्यासाठी एक खिडकी योजना राबवून सर्व परवानग्या एकाच ठिकाणी कालबद्ध मर्यादेत मिळाव्यात, अशी अपेक्षा आमदार प्रवीण दरेकर यांनी यावेळी व्यक्त केली. सहकारात भरपूर पैसा आहे. यातील काही रक्कम जरी सहकारी संस्थांनी दिली, तरी पुनर्विकासासाठी हजारो कोटी रुपयांचा निधी उभा राहील. त्यामुळे स्वयं पुनर्विकास योजनेला निधीची कमतरता भासू देणार नाही, असेही आमदार प्रवीण दरेकर यांनी स्पष्ट केले. यावेळी हौसिंग फेडरेशनचे अध्यक्ष प्रकाश दरेकर यांनी हौसिंग सोसायटींच्या समस्या सोडविण्यासाठी आम्ही तत्पर असल्याचे सांगितले. स्वयं पुनर्विकास, डीम्ड कन्व्हेन्स, सभासदांची प्रलंबित थकबाकी, तसेच कामकाजातील विविध अडचणींबाबत वेळोवेळी मोफत मार्गदर्शन फेडरेशन करीत आहे. त्याचा लाभ संस्थांनी घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.