साता-यातुन उदयनराजे भोसलेंनाच उमेदवारी
मुंबई नगरी टीम
मुंबई : राष्ट्रवादीचे आमदार शिवेंद्रराजे आणि खासदार उदयनराजे भोसले या दोन भावांमधील वाद मिटवण्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना यश आले असून, सातारा लोकसभा मतदारसंघातुन उदयनराजे भोसले यांना राष्ट्रवादीची उमेदवारी मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
राष्ट्रवादीसाठी डोकेदुखी ठरलेल्या सातारा लोकसभा मतदारसंघाचा तिढा अखेर सुटला आहे. आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आमदार शिवंद्रराजे भोसले आणि खासदार उदयनराजे भोसले या दोन भावामधिल असलेला वाद मिटवण्यात शरद पवार यांना यश आले आहे. विविध मतदार संघाचा आढावा घेण्यासाठी शरद पवार यांच्या निवासस्थानी राष्ट्रवादीच्या ज्येष्ठ नेत्यांची बैठक पार पडली. तब्बल चार झालेल्या या बैठकीला राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासह राष्ट्रवादीचे नेते अजित पवार, दिलीप वळसे पाटील, खासदार उदयनराजे भोसले, आमदार शिवेंद्रराजे भोसले, गणेश नाईक, सुनील तटकरे, जितेंद्र आव्हाड, छगन भुजबळ आदी नेते उपस्थित होते. आगामी लोकसभा निवडणुक एकदिलाने लढण्यास दोन्ही राजे तयार झाल्याचे समजते. तर लोकसभा निवडणुकीत एकदिलाने काम करण्यास सर्वांची अनुमती आहे. येणा-या काळात सर्वांना सोबत घेवून जायला तयार असल्याचे खा. उदयनराजे भोसले यांनी सांगितले.
आगामी लोकसभा निवडणुकीसाठी सातारा मतदार संघावर भाजपने दावा केला आहे. यापूर्वी हा मतदार संघ शिवसेनेकडे होता. परंतु गेल्या लोकसभा निवडणुकीच्या जागा वाटपात हा मतदारसंघ आरपीयआयला देण्यात आला होता. माथाडी कामगार नेते आणि माजी आमदार नरेंद्र पाटील यांना साता-यातुन उमेदवारी देण्याची तयारी भाजपने केली आहे.त्यामुळे येत्या लोकसभा निवडणुकीत भाजपा आणि राष्ट्रवादीचा सामना होवू शकतो.