दुसऱ्यांची मुले धुणीभांडी करण्यासाठी वापरत नाही

दुसऱ्यांची मुले धुणीभांडी करण्यासाठी वापरत नाही
मुंबई ‌नगरी टीम

मुंबईः राष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवार यांनी सुजय विखे यांच्यासंदर्भात दुसऱ्यांच्या मुलांचे हट्ट मी का पुरवू,असा सवाल केला होता. यावर आज शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मी माझ्या मुलांसोबत इतरांच्या मुलांचेही हट्ट पुरवतो, म्हणून शिवसेना सर्वसामान्यांचा पक्ष आहे,असा जोरदार टोला पवारांना लगावला.भाजप प्रवेशानंतर सुजय विखे पाटील यांनी आज उद्धव ठाकरे यांची ‘मातोश्री’वर भेट घेतली.त्यावेळी ठाकरे यांनी पवारांवर जोरदार टीका केली.

उद्धव ठाकरे म्हणाले की, दुसऱ्यांची मुले धुणीभांडी करण्यासाठी मी वापरुन घेत नाही. दोन्ही पक्षाकडून दगाफटका होणार नाही, अशी हमी यावेळी उद्धव ठाकरे यांनी सुजय विखेंना दिली.

पवार म्हणाले होते की,सुजय विखे एका जागेचा हट्ट करतो. त्यांचा बालहट्ट पुरवण्याची जबाबदारी इतर पक्षांची नाही. माझ्या घरातल्या मुलांचा हट्ट मी पुरवेन, दुसऱ्याच्या मुलाचा हट्ट मी का पुरवू? शरद पवार हे अष्टपैलू आहेत. नेते म्हणून ते चांगले आहेत, पण भविष्य कधीपासून सांगायला लागले माहित नाही,अशी टीकाही ठाकरे यांनी केली.ज्योतिषी म्हणून त्यांची ओळख नवीन आहे. आम्ही बोलतो, ते करुन दाखवतो, तसे ते बोलल्याच्या विरूद्ध करतात, असा चिमटाही उद्धव ठाकरेंनी काढला.
भाजपला जास्त जागा मिळतील,पण मोदी पंतप्रधान होणार नाहीत,असे वक्तव्य पवारांनी केले होते. त्यावर ठाकरे यांनी हा टोला लगावला आहे.

Previous articleनगरचे कार्यकर्ते स्वाभिमान गहाण ठेवत नाहीत
Next articleजालन्याचा तिढा सुटला ; खोतकर यांची माघार