राष्ट्रवादीच्या पहिल्या यादीत उदयनराजे भोसले सुप्रिया सुळेंना संधी
मुंबई नगरी टीम
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसने आज लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. आज जाहीर करण्यात आलेल्या यादीत एकूण १० उमेदवारांच्या नावांची घोषणा प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केली. विद्यमान खासदार सुप्रिया सुळे ( बारामती), उदयनराजे भोसले ( सातारा), धनंजय महाडिक ( कोल्हापूर), यासह ईशान्य मुंबईतून संजय दीना पाटील तर ठाण्यातून आनंद परांजपे यांना उमेदवारी देण्यात आली आहे.
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज राष्ट्रवादीच्या उमेदवारीसंदर्भात पक्षाच्या नेत्याशी चर्चा केल्यानंतर एकूण १० नावांवर शिक्कामोर्तब केल्यानंतर प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी लोकसभा निवडणूकीसाठी उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली.आज जाहीर करण्यात आलेल्या यादीत विद्यमान खासदार सुप्रिया सुळे ( बारामती ),उदयनराजे भोसले ( सातारा ), धनंजय महाडिक ( कोल्हापूर) यांच्यासह रायगडमधून सुनील तटकरे,बुलडाणामधून माजी मंत्री राजेंद्र शिंगणे,जळगाव मधून माजी राज्यमंत्री गुलाबराव देवकर ,परभणीतून राजेश विटेकर, ईशान्य मुंबईतून माजी खासदार संजय दीना पाटील ,ठाण्यातून माजी खासदार आनंद परांजपे तर कल्याणमधून बाबाजी बाळाराम पाटील यांना उमेदवारी देण्यात आली आहे. हातकणंगलेची जागा राष्ट्रवादीने स्वाभिमानी शेतकरी संघटनेला सोडली आहे. या ठिकाणी विद्यमान खासदार राजू शेट्टी यांना पाठींबा जाहीर करण्यात आला आहे.राट्रवादीला जागा वाटपात एकूण २२ जागा देण्यात आल्या आहेत. उर्वरीत उमेदवारांच्या नावाची घोषणा उद्या करण्यात येणार आहे.
राष्ट्रवादीने लोकसभा निवडणूकीसाठी उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली असली तरी माढा, अहमदनगर, बीड, नाशिक, शिरूर आदी ठिकाणच्या उमेदवारांच्या नावांची घोषणा केली नाही. मावळ लोकसभा मतदार संघातून पार्थ पवार यांनी प्रचाराचा नारळ फोडला असला तरी त्यांच्याही नावाची घोषणा करण्यात आली नाही.उर्वरित नावांची घोषणा येत्या एक दोन दिवसांत जाहीर करण्यात येतील, असे जयंत पाटील यांनी सांगितले.आज झालेल्या बैठकीत अहमदनगर, बीड संदर्भात संभाव्य नावांवर चर्चा करण्यात आली असून, चार ते पाच जागासंदर्भात दोन्ही कॅांग्रेसमध्ये चर्चा सुरू आहे.राष्ट्रवादीने आज ठाणे कल्याण आणि ईशान्य मुंबईच्या उमेदवारांच्या नावाची घोषणा केल्यामुळे राष्ट्रवादी मनसेला जागा सोडणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे.