” या राज्यात चाललंय काय ” ? चूक करतो त्याला माफी आणि आंदोलन करतो त्याला शिक्षा

मुंबई नगरी टीम

मुंबई । आम्हाला तुरूंगामध्ये जायला लागले तरी जावू मात्र छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान हा महाराष्ट्र सहन करणार नाही.जितेंद्र आव्हाड यासाठी तुरूंगामध्ये जात असतील त्यांचा आम्हाला अभिमान असून,राज्य सरकारने नक्की कुणाच्या बाजूने आहात याचे उत्तर दिले पाहिजे अशी मागणी करतानाच,तुम्ही छत्रपतींच्या विरोधात जर असाल तर स्पष्ट करा मग ही लढाई पूर्ण ताकदीने लढू असा स्पष्ट इशारा राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी सरकारला दिला.

हर हर महादेव हा चित्रपट बंद पाडून मारहाण केल्याप्रकरणी राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांना अटक करण्यात आली.यावर राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे आक्रमक भूमिका घेत या राज्यात चाललंय काय,जो चूक करतो त्याला पूर्ण माफी आणि एखादा आंदोलन करतो त्याला शिक्षा म्हणजे ब्रिटिश राज सुरू आहे का ? असा सवाल केला.आव्हाड हे लढवय्ये नेते आहेत.त्यांना चौकशीसाठी पोलीस स्टेशनला बोलावले.त्यानुसार ते पोलीस ठाण्यात गेले. त्यावेळी तिथे वरुन दबाव येत असल्याचे पोलीस सांगत आहेत.मला कुणावर आरोप करायचे नाहीत.दबाव येतोय त्यात पोलिसांची चूक नाही आम्ही सत्तेत असो अथवा नसो मला महाराष्ट्र पोलीसांचा सार्थ अभिमान आहे. मात्र त्यांच्यावर दबाव येतोय ही चर्चा नाकारता येत नाही. हे एकूण घटनेवरून स्पष्ट होते आहे असेही सुप्रिया सुळे म्हणाल्या.छत्रपती शिवाजी महाराजांच्या विरोधात चित्रपटात चुकीचे दाखवले जात असेल आणि एखादी व्यक्ती त्या विरोधात वेदना मांडत असेल आणि त्यासाठी त्यांना अटक होत असेल तर या अटकेचे मनापासून स्वागत करत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

जितेंद्र आव्हाड यांनी काय केले आहे.जे त्यांना थेट अटक केली जात आहे.चित्रीकरणात जितेंद्र आव्हाड मारामारी करताना दिसत नाही.ते हात बांधून सगळ्यांना गप्प रहा असे सांगत आहेत.गप्प राहणे हा गुन्हा व्हायला लागला आहे का ? असा संतप्त सवालही त्यांनी केला.छत्रपती शिवाजी महाराज आमच्या वडिलांसारखे आहेत.आन बान शान छत्रपती शिवाजी महाराज आहेत.त्यामुळे छत्रपतींचा अपमान होत असेल तर हे दुर्दैवी आहे.सत्ता काबीज करण्यासाठी माणसाने पातळी किती सोडावी हे महाराष्ट्राला लाजवणारी गोष्ट आहे अशा शब्दात सुळे यांनी नाराजी व्यक्त केली.कुठल्याही कलाकाराला त्याला जे वाटते ते बोलण्याचा मनमोकळा अधिकार आहे.त्याचे समर्थन करते.पण एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की ऐतिहासिक चित्रपट तुम्ही बनवता त्यावेळी छत्रपती शिवाजी महाराज ही दंतकथा नाही.ती आमची ओळख आहे आमचा श्वास आहे असेही सुळे यांनी ठणकावून सांगितले.छत्रपतींबद्दल तुम्ही चुकीची माहिती देणार असाल तर ते अयोग्य आहे आणि त्याचा विरोध केलाच पाहिजे. चुकीच्या माहितीआधारे विकृत दाखवू नका इतिहास खरा दाखवा असे आवाहनही सुळे यांनी केले.

महाराष्ट्राचे इतिहासक आणि चित्रपटवाले यांची एकत्र चर्चा होऊन जाऊ दे परंतु छत्रपतींचा अपमान हा महाराष्ट्र सहन करणार नाही असा स्पष्ट इशाराही सुळे यांनी दिला.गांधी’ हा सिनेमा उत्तम होऊ शकतो तर मग छत्रपतींवर असे का नवीन चित्रपट यायला लागले आहेत विकृती करु नका.सत्य दाखवा सत्याला कुणाचा विरोध नाही.सत्यमेव जयते असेही सुळे म्हणाल्या.छत्रपतींना न्याय आपण दिला पाहिजे हीच स्वाभिमानी महिला म्हणून माफक अपेक्षा व्यक्त करताना खासदार सुप्रियाताई सुळे यांनी शिवाजी महाराजांबद्दल चुकीचा इतिहास कोण दाखवेल त्याला छत्रपतींचे नाव घेण्याचा अधिकार नाही असे खडेबोल सुनावले.

Previous article२५ हजार उद्योजक घडविण्याचे शासनाचे उद्दीष्टः उद्योगमंत्री उदय सामंत
Next articleमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या धाडसी निर्णयामुळे शिवभक्तांच्या सरकारकडून अपेक्षा वाढल्या