चंद्रकांतदादा खा.राजू शेट्टींना काय म्हणाले ?
मुंबई नगरी टीम
सांगलीः खासदार असूनही तुम्हाला एक एक मतदारसंघ मागण्याची वेळ का आली,असा टोला महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी यांना लगावला.लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या दोन टप्प्यातील उमेदवारी अर्ज दाखल करण्यात येत आहेत. त्यानुसार सांगली मतदारसंघासाठी भाजपचे उमेदवार संजयकाका पाटील यांनी गुरुवारी उमेदवारी अर्ज दाखल केला.
चंद्रकांत पाटील म्हणाले की, आम्ही सुजय विखे पाटलांना विकत घेतले का फुकट घेतले,याची काळजी आम्ही करु, खासदार असूनही तुमच्यावर एक एक मतदार संघ मागण्याची वेळ आली आहे. याची तुम्ही काळजी करा.संजय काकांचा उमेदवारी अर्ज भरताना कृषिमंत्री सदाभाऊ खोत, सहकारमंत्री सुभाष देशमुख, शिवसेना आमदार अनिल बाबर यांसह इतर नेते उपस्थित होते.चंद्रकांत पाटील म्हणाले की,सांगलीमध्ये संजय काका यांच्याविरोधात काँग्रेस आणि राष्ट्रवादीकडे सक्षम उमेदवार नाही. त्यामुळे हरण्याच्या भीतीने सांगलीचा मतदार तुम्ही स्वाभिमानी शेतकरी संघटनेला देत आहात, अशी टीका चंद्रकांत पाटील यांनी केली.
सांगली मतदारसंघ आघाडीने शेट्टी यांच्या संघटनेला देण्याचा निर्णय घेतल्यावर जिल्हा काँग्रेसमध्ये जोरदार संताप उसळला आहे. वसंतदादा पाटील यांचे नातू प्रतीक पाटील यांनी तर काँग्रेसशी संबंध तोडले आहेत. त्यामुळे ही निवडणूक लक्षवेधी ठरणार आहे.