राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक हारून खान यांचा शिवसेनेत प्रवेश
मुंबई नगरी टीम
मुंबई : ऐन निवडणूकीच्या तोंडावर ईशान्य मुंबईत राष्ट्रवादीला मोठा धक्का बसला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक नंदू वैती यांनी भाजपात प्रवेश केल्यानंतर आता राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक हारून खान यांनी आपल्या समर्थकांसह शिवसेनेत प्रवेश केला आहे. हारून खान यांच्या पत्नी ज्योती हारून खान या विद्यामान नगरसेविका असून, हारून खान यांच्या शिवसेना प्रवेशामुळे ईशान्य मुंबईत महायुतीला चांगला फायदा होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
ईशान्य मुंबई मतदारसंघातील विक्रोळी पार्कसाईट येथिल राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक हारून खान यांनी राष्ट्रवादीला रामराम करीत आपल्या समर्थकांसह शिवसेनेत प्रवेश केला. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. महानगरपालिकेत राष्ट्रवादीची सदस्य संख्या खूपच कमी असल्याने स्थानिक स्तरावर काम करताना खूपच अडचणींचा सामना करावा लागत असल्याने शिवसेनेत प्रवेश केला अशी माहिती खान यांनी दिली. माझ्या वार्ड मधिल रूग्णालयाचे काम आणि सभागृहाते काम निधी अभावी अडकले आहे. शिवसेना महानगरपालिकेत सत्ताधारी असल्याने आता ही कामे मार्गी लागतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. मी कुणी बडा नेता नसून, स्थानिक स्थरावर काम करणारा एक छोटा कार्यकर्ता आहे.त्यामुळे स्थानिक प्रश्न मार्गी लागावेत यासाठीच आपण शिवसेनेत प्रवेश केला असल्याचे ते म्हणाले. आता आपण महायुतीचे उमेदवार मनोज कोटक यांच्या प्रचारात सहभागी होणार असल्याचेही त्यांनी सांगितले. काही दिवसापुर्वी राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक नंदू वैती यांनी राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देत भाजपात प्रवेश केला. त्यानंतर आज खान यांनी शिवसेनेत प्रवेश केल्याने राष्ट्रवादीला मोठा धक्का बसला आहे.