विकासकामांनी अंबरनाथची ओळख बदलली
मुंबई नगरी टीम
अंबरनाथ : गेल्या पाच वर्षांत शिवसेना-भाजप-रिपाइं महायुतीच्या सरकारच्या काळात अंबरनाथ शहरात जी विविध विकासकामे करण्यात आली, त्यामुळे तसेच अंबरनाथ शिवमंदिर आर्ट फेस्टिव्हलसारख्या उपक्रमांमुळे अंबरनाथ शहराची ओळख बदलली,असे प्रतिपादन महायुतीचे उमेदवार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी येथे केले.
डॉ. शिंदे यांचा झंझावाती प्रचार सोमवारी अंबरनाथमध्ये पार पडला. फॉरेस्ट नाका येथून भव्य मिरवणुकीस सुरुवात करण्यात आली. संघटन चौक, लादी नाका, भास्कर नगर, गुडलक चौक, मुरलीधर नगर, गणेश नगर, भवानी चौक, खुंटवली, बालाजी नगर, गावदेवी चौक, मेटल नगर,भेंडी पाडा, विम्को नाका, उलन चाळ, कोहच गाव, वांद्रे पाडा, कैलास नगर शाखा अशा सर्व भागांतून रॅली जात असताना अंबरनाथकरांचा जबरदस्त प्रतिसाद मिळाला. चौकाचौकात डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या आगमनाची वाट बघत शेकडो नागरिक, गृहिणी आणि ज्येष्ठ नागरिक उभे होते. ठिकठिकाणी डॉ. शिंदे यांना गृहिणींनी ओवाळून, तर ज्येष्ठ नागरिकांनी डोक्यावरून हात फिरवून आशीर्वाद दिले.
मोटरसायकलींचा सहभाग असलेल्या या मिरवणुकीमुळे संपूर्ण अंबरनाथमध्ये भगवे वादळ निर्माण झाले होते. आमदार डॉ. बालाजी किणिकर, नगराध्यक्ष मनिषा वाळेकर, शहरप्रमुख अरविंद वाळेकर, भाजपचे शहराध्यक्ष भरत फुलोरे, भाजप विभागीय उपाध्यक्ष किसन तारमाळे, भाजपच्या महिला विभाग अध्यक्ष सुजाता भोईर, माजी नगराध्यक्ष सुनील चौधरी, प्रज्ञा बनसोडे, सुभाष साळुंखे, शिवसेना महिला शहरसंघटक मालती पवार, ज्येष्ठ शिवसेना नगरसेवक विजय पवार, राजू वाळेकर, निखिल वाळेकर, संदीप लोटे, राजेंद्र बागुल, शशांक गायकवाड, आनंद कांबळे, संदीप भराडे, उत्तम आयवळे, अरुण सिंग, प्रमोद चौबे, स्वप्नील जाविर आदी महयुतीचे पदाधिकारी व हजारोकार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
उपस्थितांशी संवाद साधताना डॉ. शिंदे म्हणाले की, अंबरनाथ स्थानकाचा कायापालट करण्याचे काम सुरू झाले आहे. नवा प्लॅटफॉर्म, एफओबी, बुकिंग ऑफिस, एस्कलेटर्स, एलिव्हेटर्स, स्वच्छतागृह अशा सर्व सुविधा उपलब्ध होणार आहेत. प्रदीर्घ संघर्षानंतर बदलापूर आणि अंबरनाथच्या मध्ये नव्या चिखलोली स्थानकाला मंजुरी मिळाली आहे. अंबरनाथ शहरातले सर्व प्रमुख रस्ते काँक्रिटचे झाले आहेत. शिवमंदिर आर्ट फेस्टिव्हलमुळे अंबरनाथ शहराला नवी सांस्कृतिक ओळख मिळाली आहे. हजार वर्षे प्राचीन शिवमंदिराला नवी झळाळी मिळाली. शिवमंदिर परिसराच्या सुशोभीकरणाचे कामही हाती घेण्यात आले आहे. मंदिराशेजारून वाहाणाऱ्या वालधुनी नदीतील सांडपाणी बंद करण्यात आले आहे. या सर्व विकासकामांमुळे अंबरनाथ शहरातील गुन्हेगारीलाही आळा बसला आहे, असेही त्यांनी सांगितले.