डॉ. श्रीकांत शिंदे यांना वाढता पाठिंबा
मुंबई नगरी टीम
ठाणे : डोंबिवलीतील गुजराती, मारवाडी, जैन, कच्छी समाजाच्या कौटुंबिक मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी या चारही समाजांचा एकमुखी पाठिंबा महायुतीचे उमेदवार डॉ. श्रीकांत शिंदे यांना यांना जाहीर करण्यात आला.
या प्रसंगी कार्यक्रमास महापौर विनिता राणे, स्थायी समिती सभापती दीपेश म्हात्रे, शहरप्रमुख राजेश मोरे, कमलेश शामजी शाह, जितेंद्र नाहर, अजय जैन, आदी मान्यवर तसेच गुजराती, जैन, मारवाडी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.या शिवाय विविध समाज घटकांनीही शिंदे यांना पाठिंबा जाहीर केला आहे.वैद्यकीय क्षेत्राच्या समस्या सोडवण्याची क्षमता स्वतः डॉक्टर असलेले श्रीकांत शिंदे यांच्याकडे आहे. या समस्यांची त्यांना जाण आहे, तसेच शासन, डॉक्टर आणि रुग्ण यांच्यातील ते चांगला दुवा ठरत आहेत. त्यामुळे त्यांना जाहीर पाठिंबा देण्याचा निर्णय घेतल्याचे अंबरनाथमधील विविध वैद्यकीय संघटनांच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे.शिवसेना-भाजप-रिपाइं महायुतीचे कल्याण लोकसभेचे उमेदवार डॉ. श्रीकांत शिंदे यांना दररोज विविध समाजगटांचा वाढता पाठिंबा मिळत आहे. इंडियन मेडिकल असोसिएशनची अंबरनाथ शाखा, अंबरनाथ मेडिकल असोसिएशन, तसेच अंबरनाथ जनरल प्रॅक्टिशनर्स वेल्फेअर असोसिएशन या संघटनांनी डॉ. शिंदे यांच्या उमेदवारीला जाहीर पाठिंबा दिला असून लक्षणीय संख्या असलेल्या केरळी समाजाच्या अंबरनाथ केरळी समाज या संस्थेनेही पाठिंबा दिला आहे.
श्रीकांत शिंदे स्वतः डॉक्टर असून वैद्यकीय क्षेत्रासमोरच्या समस्यांची त्यांना जाणीव आहे. डॉक्टरांवरील हल्ले रोखण्यासाठी संसदेत कठोर कायद्याचे खासगी विधेयक त्यांनी मांडले आहे. त्याचबरोबर गोरगरीब रुग्णांना विनामूल्य उपचार मिळावेत, यासाठी सरकारतर्फे हेल्थ कार्ड देण्याबाबतचे खासगी विधेयकही त्यांनी मांडले आहे. हिमोफेलिया, थॅलेसेमिया, सिकलसेल यांसारख्या रक्तदोषाधारित अपंग व्यक्तींना आरक्षणाचा लाभ मिळावा, यासाठी डॉ. शिंदे यांनी केलेल्या प्रयत्नांना यश आले आहे. शिवाय, वैद्यकीय शिबिरांच्या माध्यमातून दोन लाखांहून अधिक रुग्णांची विनामूल्य वैद्यकीय तपासणी करण्याचे महत्त्वाचे काम त्यांनी केले. २५ कोटींहून अधिकची वैद्यकीय मदत रुग्णांना उपलब्ध करून दिली. हे त्यांचे कार्य पाहून, तसेच वैद्यकीय क्षेत्रासमोरील समस्या सोडवण्याची क्षमता त्यांच्यात असल्याची खात्री पटल्याने त्यांच्या उमेदवारीला पाठिंबा देत असल्याचे इंडियन मेडिकल असोसिएशनची अंबरनाथ शाखा, अंबरनाथ मेडिकल असोसिएशन, तसेच अंबरनाथ जनरल प्रॅक्टिशनर्स वेल्फेअर असोसिएशन यांनी म्हटले आहे.
अंबरनाथ केरळी समाजाने डॉ श्रीकांत शिंदे यांना जाहीर पाठिंबा दिला. केरळमध्ये गेल्या वर्षी आलेल्या पुराच्या वेळी शिवसेनेने पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली तिथे मदत सामग्री, तसेच वैद्यकीय पथक पाठवले होते. स्वतः डॉ. शिंदे यांनी या पथकात सहभागी होत केरळमध्ये पूरग्रस्तांना मदत केली होती. एरवीही शिवसेना नेहमीच केरळी बांधवांच्या सुखदुःखात सहभागी असते. यामुळे श्रीकांत शिंदे यांच्या उमेदवारीला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतल्याचे या प्रसंगी आयोजित बैठकीत सांगण्यात आले. पालकमंत्री एकनाथ शिंदे, केरळी समाजाचे शैलेश बालन, अजयन, विजयन, ए. बी. नायर, राजेश नायर, भाजपा केरळी समाजाचे अध्यक्ष मनोज पिल्ले, आमदार डॉ. बालाजी किणिकर,शहरप्रमुख अरविंद वाळेकर, माजी नगराध्यक्ष सुनील चौधरी आदी मान्यवर, तसेच केरळ समजाचे असंख्य नागरिक, तसेच विविध राजकीय पक्षांची मंडळीही यावेळी उपस्थित होती. कम्युनिस्ट पक्ष, काँग्रेस आदी पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनीही डॉ. शिंदे यांनाच साथ देणार असल्याचे यावेळी सांगितले.
मेलमरुवथुर अधिपरशक्ती स्पिरिच्युअल मूव्हमेंट या आध्यात्मिक संस्थेच्या सदस्यांनीही डॉ. शिंदे यांना पाठिंबा दिला आहे. संस्थेचे सात हजारांहून अधिक सदस्य असून त्यांनी डॉ. शिंदे यांना पाठिंबा देण्याचा निर्णय घेतल्याचे त्यांच्या पत्रकात म्हटले आहे.अंबरनाथ येथील यशवंत को ऑप हाउसिंग सोसायटी या गृहसंकुलाच्या सदस्यांनीही एकमताने डॉ. शिंदे यांच्या उमेदवारीला पाठिंबा दिला आहे. या सोसायटीअंतर्गत यशवंत बॅकवर्ड क्लास को ऑप हाउसिंग सो., रत्नप्रभा बॅकवर्ड क्लास को. ऑप. हाउसिंग सो., सदानंद को. ऑप. हाउसिंग सो. आणि सावित्रीबाई फुले महिला को. ऑप. हाउसिंग सो. (नियोजित) आदी सोसायट्यांचा समावेश आहे.