मुलाने विरोध केल्याने खासदार गजानन किर्तीकरांनी शिंदे गटात जाण्याचा निर्णय बदलला ?

मुंबई नगरी टीम

मुंबई । उत्तर पश्चिम लोकसभा मतदार संघाचे शिवसेनेचे खासदार गजानन किर्तीकर हे शिवसेना सोडून शिंदे गटाला पाठिंबा देणार असल्याची चर्चा सुरू असताना खासदार गजानन किर्तीकर यांचे पुत्र आणि शिवसेनेचे उपनेते अमोल किर्तीकर यांनी याला विरोध केल्याने गजानन किर्तीकर यांनी शिंदे गटाला पाठिंबा देण्याचा निर्णय बदलला असल्याचे समजते.शिवसेना आणि पक्षप्रमुख उद्धव ठाकरे अडचणीत असताना त्यांना सोडणे म्हणजे माझ्या सारखा दुसरा मतलबी नसल्याचे अमोल किर्तीकर म्हणाल्याचे सूत्रांनी सांगितले.

शिवसेनेच्या ४० आमदारांनी आणि १२ खासदारांनी शिवसेनेला सोडून शिंदे यांना साथ देण्याचा निर्णय घेतल्याने शिवसेना खिळखिळी झाली असतानाच शिंदे गटाच्या होणा-या दसरा मेळाव्यात मुंबईतील एक ज्येष्ठ खासदार शिवसेना सोडून शिंदे यांना पाठिंबा देणार असल्याची चर्चा होती.उत्तर पश्चिम लोकसभा मतदार संघाचे शिवसेनेचे खासदार गजानन किर्तीकर यांच्या शस्त्रक्रिया झाल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या घरी जाववून त्यांची विचारपुस केली होती.तर गेल्या काही दिवसात शिवसेना खासदार गजानन किर्तीकर यांनी वर्षावर जावून मुख्यमंत्री शिंदे यांची भेट घेतली होती.त्यामुळे किर्तीकर लवकरच शिंदे गटाला पाठिंबा देणार असल्याच्या चर्चा सुरू झाल्या.या चर्चा सुरू असतानाच खासदार किर्तीकर यांनी मातोश्रीवर जावून पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेवून चर्चा केल्याचे सांगण्यात येते.या घडामोडी सुरू असतानाच अमोल किर्तीकर यांची उपनेतेपदी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी नियुक्ती करून चर्चांना पुर्णविराम देण्याचा प्रयत्न केला.

खासदार गजाजन किर्तीकर यांना केंद्रात मंत्रीपद तर त्यांच्या मुलाला विधान परिषदेवर संधी देण्याचा निर्णय शिंदे गटाने घेतला होता.त्याच वेळी अमोल किर्तीकर यांची शिवसेनेच्या उपनेतेपदी नियुक्ती करतानाच त्यांना उत्तर पश्चिम लोकसभा मतदार संघातून निवडणूक लढण्याची तयारी करण्याचे स्पष्ट संकेत उद्धव ठाकरे यांनी दिल्याचे सूत्रांनी सांगितले.त्यामुळे अमोल किर्तीकर यांनी शिंदे गटाला पाठिंबा देण्यास स्पष्ट नकार दिल्याने गजानन किर्तीकर यांनी शिंदे गटाला पाठिंबा देण्याचा निर्णय बदलल्याची चर्चा आहे.सध्या शिवेसना आणि पक्षप्रमुख अडचणीत असताना त्यांची साथ सोडली तर देव मला माफ करणार नाही शिवाय असा निर्णय घेतल्यास माझ्या सारखा दुसरा मतलबी नसेल, असे स्पष्टपणे अमोल किर्तीकर म्हणाल्याचे समजते.गजानन किर्तीकर हे वयोमानानुसार आगामी लोकसभा निवडणूक लढवण्यास फारसे उत्सुक नसल्याने रविंद्र वायकर किंवा सुनिल प्रभू यांनी येथून लोकसभा निवडणूक लढवावी असा आग्रह होता. मात्र वायकर आणि प्रभू लोकसभेत जाण्यास इच्छूक नसल्याने शेवटी उत्तर पश्चिम लोकसभा मतदार संघातून शिवसेनेकडून गजानन किर्तीकर यांचे पुत्र अमोल किर्तीकर यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्याचे खात्रीलायक वृत्त आहे.

Previous articleसामान्य नागरिकांना कामांसाठी कार्यालयात हेलपाटे मारावे लागू नये ; मुख्यमंत्र्यांचे निर्देश
Next articleकंत्राटी वैद्यकीय सहायक,आशा सेविका आणि अंगणवाडी सेविकांसाठी सरकारने घेतला मोठा निर्णय