वसईत सत्ताबदल करून गुंडगिरी संपवा

वसईत सत्ताबदल करून गुंडगिरी संपवा

मुंबई नगरी टीम

पालघर : महायुतीचे पालघर मतदारसंघाचे उमेदवार राजेंद्र गावित यांच्या प्रचारासाठी  पालघर दौऱ्यावर असलेले शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी वसई येथील ‘द रॉयल क्लब येथे समाजातील प्रतिष्ठित नागरिक, पर्यावरण प्रेमी, कलाकार, डॉक्टर,वकील आदी विविध समाजघटकांशी मुक्त संवाद साधला.

वसईत बजबजपुरी माजली असून, येथील परिस्थिती सुधारण्यासाठी, तसेच वसई शहरातील नागरिकांचे जीवनमान सुधारण्यासाठी महापालिकेतील गुंडगिरीचे साम्राज्य मिटवण्याची आग्रही मागणी वसईतील नागरिकांनी उद्धव ठाकरे यांच्याकडे केली.

उद्धव ठाकरे यांच्याशी संवाद साधताना वसईकरांनी शहराशी, तसेच देशाशी संबंधित अनेक प्रश्न मांडले. वसई-विरारमध्ये किमान सुविधांचाही बोजवारा उडाला आहे. पाणीपुरवठा, रस्ते, स्वच्छता अशा कुठल्याच बाबतीत नागरिकांना पुरेशा सोयीसुविधा मिळत नाहीत, असे नागरिकांचे म्हणणे होते. त्यावर, ‘वसई-विरारच्या सर्वांगीण विकासासाठी आपल्या सर्वांच्या साथीने शिवसेना-भाजप महायुती निश्चितपणे पुढाकार घेईल आणि गुंडगिरी मोडून काढेल,’ असा विश्वास उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला.

याप्रसंगी आरोग्यमंत्री व सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे, गृहराज्यमंत्री दीपक केसरकर, संपर्कप्रमुख आमदार रविंद्र फाटक, उमेदवार राजेंद्र गावित, निलेश तेंडोलकर, शिवसेना जिल्हा सचिव मिलिंद खानोलकर आदी उपस्थित होते.त्यानंतर उद्धव ठाकरे यांची पालघरमध्ये जंगी सभा झाली. सभेसाठी जमलेल्या विशाल जनसागराला संबोधित करताना ते म्हणाले की, जनतेला जे हवे ते देणारे शिवसेना-भाजपचे सरकार आहे. कोकणातील गावकऱ्यांच्या मागणीप्रमाणे मी त्यांच्या पाठीशी उभा राहिलो आणि नाणारच्या प्रकल्पासाठी विरोध करून तो प्रकल्प रद्द केला, याची आठवण त्यांनी करून दिली. याआधी पालघर मतदारसंघात आलो होतो, त्यावेळी इथल्या माता-भगिनींना सांगितले होते की, इथली गुंडगिरी बंद पाडेन. इथल्या गुंडांना वाटत होतं की इथली जनता साधीभोळी आहे. या गुंडांचा माज आता उतरवायचा आहे. मला इथल्या विजयाची खात्री आहे. राजेंद्र गावित हे खासदार होणार, असेही ते म्हणाले.

Previous articleमुंब्र्यात शिवसेना-भाजप-रिपाइं महायुतीचे तुफान
Next articleराष्ट्रवादीचे आमदार हनुमंत डोळस यांचे निधन