दुष्काळी परिस्थिती हाताळण्यात राज्य सरकार अपयशी

दुष्काळी परिस्थिती हाताळण्यात राज्य सरकार अपयशी

मुंबई नगरी टीम

मुंबई : राज्यातील दुष्काळाची दाहकता प्रचंड वाढली असताना भाजप-शिवसेना सरकारचे नियोजन मात्र कुठेच दिसत नाही. चारा व पाण्याची अनुपलब्धी राज्यभर जनतेच्या जीवावर उठली आहे. याचाच परिणाम दुष्काळी भागातून स्थलांतर वाढण्यात झाले आहे, असा आरोप काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांनी केला आहे.

दुष्काळी परिस्थितीवर प्रतिक्रिया देताना चव्हाण यांनी सरकारच्या अपयशाचा पाढा वाचला. पशुसंवर्धन मंत्री महादेव जानकर जत भागात तर जुन्नरमध्ये गिरीश महाजन नुकतेच भेट देण्यास गेले असता या दोन्ही मंत्र्यांना शेतकऱ्यांच्या प्रचंड मोठ्या आक्रोषाला सामोरे जावे लागले, यातूनच जनता किती त्रस्त आहे हे दिसून येते. पण सरकारी पातळीवर मात्र दुष्काळाकडे गंभीरपणे पाहिले जात नाही असे चित्र आहे.

दुष्काळी स्थितीचा सामना करण्यासाठी सरकार सज्ज असून केंद्र सरकारकडून राज्याला निधी मिळाल्याचे  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे, मग हा निधी दुष्काळी जनतेला पावसाळा सुरु झाल्यानंतर देणार आहात का? केंद्राकडून मदत मिळवण्यात एवढी दिरंगाई का झाली? असा संतप्त सवाल  चव्हाण यांनी विचारला आहे.

दुष्काळग्रस्त मराठवाड्यासह, सोलापूर व इतर भागातून स्थलांतराचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढलेले आहे. या भागातले लोक पुणे, मुंबईसारख्या शहरात नातेवाईकांकडे  आसरा घेऊ लागले आहेत. तर काही लोकांना मुंबईच्या फुटपाथ, उड्डाणपुलाच्या खाली मोकळ्या जागेचा आधार घ्यावा लागत आहे, राज्य सरकारने त्यांना योग्य ती मदत देण्याची गरज आहे, असे चव्हाण म्हणाले.

दुष्काळाची दाहकता प्रचंड आहे, पाण्याची समस्या जशी उग्र बनली आहे, तशीच रोजगाराची समस्याही आहे. सरकारचे नियोजन नसल्यामुळेच सामान्य जनतेला त्याची मोठी झळ बसत आहे. हे पाहता दुष्काळी परिस्थिती हाताळण्यात राज्य सरकार पूर्णपणे अपयशी ठरले आहे, असा आरोप चव्हाण यांनी केला आहे.

Previous articleदुष्काळ निवारणासाठी केंद्राकडून राज्याला आणखी २१६० कोटी रुपये
Next articleजनावरांसाठी टँकरच्या पाण्यात वाढ करा