काँग्रेसचे पथक दुष्काळी भागाच्या पाहणी दौऱ्यावर!

काँग्रेसचे पथक दुष्काळी भागाच्या पाहणी दौऱ्यावर!

मुंबई नगरी टीम

मुंबई : राज्यात सध्या भीषण दुष्काळाचे संकट असून दुष्काळग्रस्तांना वेळेवर व योग्य ती मदत पुरवण्यात भाजप-शिवसेना सरकार अपयशी ठरले आहे. सरकारच्या घोषणा फक्त कागदावरच आहेत. सरकारचे हे अपयश उघडे पाडण्यासाठी व दुष्काळग्रस्तांच्या व्यथा जाणून घेण्यासाठी काँग्रेसचे पथक दुष्काळी भागाची पाहणी करत आहेत.

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रांताध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांच्या अध्यक्षेखाली १० मे रोजी मुंबईतील टिळक भवन येथे राज्यातील सर्व जिल्हाध्यक्ष, आमदार व वरिष्ठ नेत्यांची बैठक घेऊन दुष्काळी समस्यांवर चर्चा करण्यात आली. त्यानंतर राज्यपाल सी. विद्यासागर राव यांची भेट घेऊन दुष्काळी भागाला तातडीने मदत मिळावी यासाठी सरकारला निर्देश देण्याची मागणीही करण्यात आली. तसेच विभागावर पथक नेमून त्यांना दुष्काळी भागाची पाहणी करण्याचे निर्देश देण्यात आले होते. प्रांताध्यक्षांच्या निर्देशानुसार हे दुष्काळी पाहणी दौरे सुरु करण्यात आले आहेत. विदर्भ व उत्तर महाराष्ट्रात सोमवारपासून हे पाहणी दौरे सुरु करण्यात आलेत तर मंगळवारपासून इतर विभागात काँग्रेसचे पथक दौऱ्यावर जात आहे.

विदर्भ विभागात विजय वडेट्टीवार यांच्या अध्यक्षतेखाली, मराठवाड्यात बसवराज पाटील व मधुकराव चव्हाण, उत्तर महाराष्ट्रात बाळासाहेब थोरात तर पश्चिम महाराष्ट्रात माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली काँग्रेसची दुष्काळग्रस्त समिती स्थापन करण्यात आलेली आहे. या दौऱ्यावेळी चारा छावण्यांना भेटी देणे, शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन शेतीचे झालेले नुकसान तसेच पिण्याच्या पाण्याची स्थिती काय आहे याची माहिती हे पथक घेणार आहे. शेतकऱ्यांशी संवादही साधला जाणार आहे, त्यानंतर स्थानिक पदाधिकाऱ्यांशी चर्चा करून प्रांताध्यक्ष अशोक चव्हाण यांना अहवाल सादर केला जाणार आहे.

Previous articleदुष्काळाच्या प्रश्नासंदर्भात मुख्यमंत्र्यांना भेटणार –  शरद पवार
Next articleनदी असलेल्या गावांमध्येही पाण्याचे टँकर सुरू करा