लोकसभा निकालानंतर राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार ?
मुंबई नगरी टीम
मुंबई : लोकसभा निवडणूकीचे निकाल लागताच राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार होणार असल्याची जोरदार चर्चा सुरू आहे. येत्या १७ जून पासून राज्य विधिमंडळाचे अधिवेशन सुरू होत आहे. त्यापूर्वीच मंत्रिमंडळ विस्तार होण्याची शक्यता आहे. आगामी विधानसभा निवडणूकीच्या तोंडावर मंत्रिमंडळात नव्या चेह-यांना संधी दिली जाईल तर राष्ट्रवादी आणि काँग्रेसला सोडचिठ्ठी दिलेल्या काही बड्या नेत्यांना या विस्तारात संधी दिली जाणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.
लोकसभा निवडणूकींचा निकाल येत्या २३ मे रोजी जाहीर होणार आहे. या निवडणूकीत भाजप शिवसेनेला चांगले यश मिळाल्यास हा विस्तार होवू शकतो. त्यामध्ये भाजपसह शिवसेनेच्या नव्या चेह-यांना संधी दिली जाणार आहे. देशात भाजपच्या बाजूने कौल आल्यास लोकसभा निवडणूकीत स्वपक्षाला हादरे दिलेले नगर जिल्ह्यातील बडे प्रस्थ राधाकृष्ण विखे पाटील, बीडचे जयदत्त क्षिरसागर आणि अकलूजचे विजयसिंह मोहिते पाटील या काँग्रेस-राष्ट्रवादीतील बंडखोर नेत्यांचा समावेश मंत्रिमंडळात केला जाण्याची शक्यता असून, त्यांना महत्वाची खाती देण्यात येणार असल्याची चर्चा आहे.
लोकसभा निकालानंतर पावसाळी अधिवेशन सुरू होणार आहे. विधानसभेतील विरोधीपक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. त्याला सभागृहात मंजूरी दिली जाईल. परंतु त्याच पूर्वी लोकसभा निवडणूकीत त्यांचे पुत्र सुजय विखे पाटील विजयी झाल्यास निकालाच्या दुस-याच दिवशी राधाकृष्ण विखे पाटील काँग्रेसला सोडचिठ्ठी देतील अशी चर्चा आहे. विखे पाटील यांनी दोनच दिवसापूर्वी मंत्री गिरिश महाजन यांची भेट घेवून चर्चा केली आहे.पांडूरंग फुंडकर यांच्या निधनामुळे रिक्त असलेल्या कृषी खात्याचा अतिरिक्त कार्यभार चंद्रकांत पाटील यांच्याकडे आहे. पुण्यातील लोकसभेच्या जागेवर गिरीश बापट यांच्या विजयाची खात्री असल्याने त्यांच्याकडे असणारे अन्न आणि नागरी पुरवठा तसेच संसदीय कामकाज ही दोन खाती रिक्त होतील. लोकसभा निवडणूकीच्या निकालानंतर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते भाजपमध्ये प्रवेश करण्याची शक्यता आहे. माजी विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील, राष्ट्रवादीचे नेते विजयसिंह मोहिते पाटील, जयदत्त क्षीरसागर यांना विस्तारात सामावून घेतले जावू शकते.