ग्रामपंचायतींचा निकाल एका क्लिकवर ; अनेक ठिकाणी बड्या नेत्यांना धक्का

मुंबई नगरी टीम

मुंबई : राज्यातील १२ हजार ७११ ग्रामपंचायतींसाठी शुक्रवारी झालेल्या मतदानाचे कल सोमवारी हाती आले. ग्रामपंचायत निवडणुकीत सर्वच पक्षांनी आपली सत्ता राखण्याचा प्रयत्न केला. काही ठिकाणी अनपेक्षित असे यश अनेक पक्षांना मिळाल्याचे चित्र आहे. प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना आपल्या खानापूर गावातील ग्रामपंचाय राखता आली नसून भाजपसाठी हा धक्का मानला जात आहे. तर केवळ चंद्रकांत पाटीलच नव्हे तर भाजपच्या अनेक प्रस्थापितांना त्यांचाच बालेकिल्ला राखण्यात मोठी पंचायत झाल्याचे पाहायला मिळाले.

शिवसेनकडून राणेंना पहिला धक्का

भाजप आमदार नितेश राणेंना सिंधुदुर्गात पहिला धक्का हा शिवसेनकडून बसला आहे. कणकवली तालुक्यातील भिरवंडे ग्रामपंचायतीत ७ पैकी ४ जागा या शिवसेनेने बिनविरोध निवडून आणल्या आहेत.उर्वरित तीन जागांवरही शिवसेनेचेच सदस्य निवडून आले आहेत. कणकवली तालुक्यातील भिरवंडे आणि गांधीनगर ग्रामपंचायत शिवसेनेकडे तर तोंडीवली-बावशी ग्रामपंचायत भाजपकडे गेली आहे. कणकवली हा नितेश राणेंचा मतदारसंघ असल्याने भाजपसाठी हा मोठा धक्का आहे. मात्र शिवसेनेकडून बसलेला हा धक्का नितेश राणेंच्या काही पचनी पडलेला दिसत नाही. तर सर्वाधिक जागा या भाजपनेच जिंकल्याचा दावा राणेंनी केला आहे. नितेश राणेंना धक्का देणारा अजूनपर्यंत जन्माला आलेला नाही आणि येणार पण नाही. ७० पैकी ५५ ग्रामपंचायती भाजपने जिंकल्या आहेत,असे नितेश राणेंनी प्रसारमाध्यमांशी बोलताना म्हटले.
दरम्यान,कणकवलीत भाजपला धक्का बसला असला तरी मालवणमध्ये सहापैकी पाच जागांवर कमळ फुलले आहे. कुडाळमध्येही भाजपने मुसंडी मारली आहे. हा पराभव शिवसेनेचे आमदार वैभव नाईक यांच्यासाठी मोठा धक्का मानला जात आहे.
लोणीखुर्दमध्ये विखे-पाटलांना धोबीपछाड

भाजपचे आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांचे अहमदनगरमधील लोणीखुर्द हे गाव आहे. या गावातील ग्रामपंचायतीवर गेल्या २० वर्षांपासून विखे पाटलांचे वर्चस्व होते. मात्र या ग्रामपंचायतीच्या १७ पैकी १३ जागा परिवर्तन पॅनलने जिंकत विखे-पाटलांना पराभवाची धूळ चारली आहे. विखे पाटील स्वतः आमदार आहेत तर त्यांचे पुत्र सुजय विखे पाटील हे भाजपचे खासदार आहते. असे असतानाही गावातील हातची सत्ता विखे-पाटलांना राखण्यात अपयश आले आहे.

जालन्यात भाजपचा धुव्वा, दानवेंना धक्का

जालना ग्रामपंचायत निवडणुकीत भोकरदन तालुक्यात भाजपला जोरदार हादरा बसला आहे. पिंपळगाव ग्रामपंचायतीत महाविकास आघाडीने विजय मिळवला आहे. येथील १३ पैकी १२ जागांवर महाविकास आघाडीच्या नेत्यांनी विजय मिळवला आहे. पारध, वालसांगवी, सिपोरा बाजार, केदारखेडा अशा मोठ्या ग्रामपंचायतीत भाजपने सत्ता गमावल्याचे पाहायला मिळत आहे. केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्या समर्थकांना डावलून गावकऱ्यांनी महाविकास आघाडीच्या बाजूने कल दिल्याचे चित्र आहे.

राम शिंदेच्या चौंडीत राष्ट्रवादीच्या विजयाचा गुलाल

विधानसभा निवडणुकीनंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी पुन्हा एका भाजपच्या राम शिंदेंना हादरा दिला आहे. राम शिंदे यांच्या चौंडी गावातील ग्रामपंचायत निवडणुकीत रोहित पवार यांचा गट विजयी झाला आहे. येथील ९ पैकी ७ जागांवर रोहित पवार यांच्या गटाने आपले वर्चस्व स्थापित केले आहे. तर राम शिंदे यांच्या गटाला दोनच जागा राखता आल्या आहेत. रोहित पवार हे नेहेमीच लोकांमध्ये जाऊन काम करताना दिसले. जनतेचे प्रश्न त्यांच्या समस्या जाणून त्यांनी आपली पावले टाकली. त्यांच्या याच जनसंपर्कामुळे ग्रामपंचायतीत त्यांचा हा विजय मानला जात आहे.

Previous articleग्रामसभांवरील स्थगिती उठवली ;ग्रामसभांचे आयोजन करण्यास परवानगी
Next articleघासून नाय,तर विरोधकांची ठासून; ‘या’ ग्रामपंचायतींवर मनसेचा विजयी गुलाल