ग्रामसभांवरील स्थगिती उठवली ;ग्रामसभांचे आयोजन करण्यास परवानगी

मुंबई नगरी टीम

मुंबई : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात ग्रामसभांचे आयोजनास बंदी घालण्यात आली होती.परंतु राज्यातील ३४ जिल्ह्यातील १२ हजार ७११ ग्रामपंचायतीच्या निवडणूकांचे निकाल जाहीर होताच राज्य सरकारने सामाजिक अंतर आणि कोरेनाच्या अनुषंगाने निर्गमित विविध मार्गदर्शक तत्त्वांचे काटेकोरपणे पालन करून राज्यातील सर्व ग्रामपंचायतींना पूर्वीप्रमाणे ग्रामसभांचे आयोजन करण्यास संमती देण्यात दिली आहे.याची माहिती राज्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली.

ग्रामविकास मंत्री मुश्रीफ म्हणाले की, महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियमानुसार प्रत्येक वित्तीय वर्षात निदान चार ग्रामसभांचे आयोजन करणे बंधनकारक आहे.अशाप्रकारे ग्रामसभेचे आयोजन न केल्यास संबंधित सरपंच,उपसरपंच, आणि ग्रामसेवक यांना जबाबदार धरून त्यांच्याविरुद्ध कार्यवाही करणेची तरतूद आहे.तथापि, कोरोना विषाणूच्या प्रसारास प्रतिबंध करण्यासाठी केंद्र व राज्य शासनाने वेळोवेळी दिलेले आदेश,अधिसूचना यानुसार सर्व प्रकारच्या सामाजिक,राजकीय सभा व संमेलनांवर बंदी घालण्यात आली होती.त्याचप्रमाणे ग्रामसभा घेण्यास तात्पुरत्या स्वरुपात स्थगिती देण्यात आली होती. परंतु सद्यस्थितीत कोरेनाच्या अनुषंगाने लॉकडाऊन काळातील निर्बंधांमध्ये शिथिलता येत असून बहुतांश जनजीवन पूर्ववत होत असल्याने ग्रामसभांच्या आयोजनास देण्यात आलेली स्थगिती उठविण्यात येत आहे.यासंदर्भातील शासन परिपत्रक निर्गमित करण्यात आले आहे, असेही मुश्रीफ यांनी सांगितले.

ग्रामविकासात ग्रामपंचायतीच्या ग्रामसभांना असलेले अनन्यसाधारण महत्व लक्षात घेता ग्रामसभांचे पूर्वीप्रमाणे आयोजन होणे गरजेचे आहे. कोरोना नियंत्रणासाठीच्या सर्व नियमांचे पालन करुन ग्रामसभा पूर्ववत सुरु करण्यास संमती देण्यात येत असल्याचे मंत्री मुश्रीफ यांनी सांगितले.

Previous articleगंभीर आरोप होवूनही परळीत धनुभाऊंना जनतेची खंभीर साथ
Next articleग्रामपंचायतींचा निकाल एका क्लिकवर ; अनेक ठिकाणी बड्या नेत्यांना धक्का