निर्बंध शिथिल : राज्यातील पर्यटन स्थळे खुली; लग्नसमारंभासाठी २०० व्यक्तींना परवानगी

मुंबई नगरी टीम

मुंबई । राज्य शासनाने १ फेब्रुवारी पासून राज्यातील सर्व राष्ट्रीय उद्याने,सफारी, पर्यटन स्थळे, स्पा, समुद्रकिनारे,मनोरंजन पार्क, जलतरण तलाव,नाट्यगृह,हॉटेल तसेच सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी सशर्त परवानगी दिली आहे.यात लग्नसमारंभासाठी २०० व्यक्तीपर्यंत मुभा असेल तर अंतिम संस्कारासाठी उपस्थित राहणाऱ्यांच्या संख्येवर कोणतेही निर्बंध नसणार आहेत.राज्य सरकारने काल रात्री उशीराने सुधारित नवीन नियमावली जाहीर केली आहे.

राज्यातील वाढत्या कोरोना रूग्ण संख्येमुळे राज्यातील निर्बंध कडक करण्यात आले होते.मात्र सध्या राज्यातील रूग्ण संख्येत घट झाल्याने राज्य सरकारने निर्बंध शिथिल केले आहेत.त्यानुसार आज १ फेब्रुवारी पासून राज्यातील सर्व राष्ट्रीय उद्याने आणि सफारी हे नियमित वेळेत सुरु राहतील, परंतु इथे भेटी देणाऱ्या सर्व लोकांचे पूर्णपणे लसीकरण झालेले असणे आवश्यक आहे.तसेच राज्यभरात ऑनलाइन तिकिट लागू असलेले सर्व पर्यटन स्थळे नियमित वेळेत सुरु राहतील. ब्युटी सलून तसेच केशकर्तनालय यांना लागू असलेल्या सर्व निर्बंधांसह राज्यातील स्पा क्षमतेच्या पन्नास टक्के उपस्थितीत सुरु राहतील.यापूर्वी अंतिम संस्कारासाठी केवळ २० लोकांना परवानगी देण्यात आली होती.आता अंतिम संस्कारासाठी उपस्थित राहणाऱ्या लोकांच्या संख्येवर कोणतेही निर्बंध नसतील.स्थानिक प्रशासनाने निर्धारित केलेल्या वेळेनुसार समुद्रकिनारे, उद्याने,पार्क सुरु ठेवता येईल.मनोरंजन उद्याने),थीम पार्क पन्नास टक्के क्षमतेने सुरु ठेवण्यात येणार आहेत.जलतरण तलाव, वॉटर पार्क हेही पन्नास टक्के क्षमतेने सुरु ठेवता येईल.उपहारगृहे, नाट्यगृहे, चित्रपटगृहे हे जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्रशासनाने घेतलेल्या निर्णयानुसार ५० टक्के क्षमतेने सुरु ठेवण्यास परवानगी असेल.

भजन आणि इतर स्थानिक सांस्कृतिक आणि लोककला, मनोरंजक कार्यक्रम हे दालन किंवा मंडपाच्या ५० टक्के क्षमतेने सुरु राहू शकतील.उघडे मैदान किंवा कार्यक्रम सभागृह असलेल्या ठिकाणी २५ टक्के क्षमतेने लग्नात उपस्थिती असू शकते किंवा कमाल दोनशे लोक (जी कोणती संख्या कमी असेल) त्यालाही मुभा असेल.तसेच रात्री ११ ते पहाटे पाच वाजेपर्यंत कोणते निर्बंध लागू असावेत या बद्दल स्थानिक पातळीवर जिल्हा प्रशासन निर्णय घेऊ शकते.घोड्यांची शर्यत व इतर खेळांसाठी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्रशासन २५ टक्के प्रेक्षकांच्या मर्यादित उपस्थितीत परवानगी देऊ शकते.आठवडी बाजार उघडण्याची परवानगीही स्थानिक आपत्ती व्यवस्थापन प्रशासन देऊ शकते.

Previous articleराज्यातील नेते म्हणाले..अर्थसंकल्प म्हणजे ” खोदा पहाड निकला चूहा “
Next article२ कोटी नोकऱ्या देण्याचे आश्वासन फसल्यानंतर ६० लाख नोकऱ्यांचे नवं गाजर