राज ठाकरे यांची पत्राद्वारे बळीराजाला साद !
मुंबई नगरी टीम
मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राज्यातील बळीराजाला पत्राद्वारे साद घालीत उद्या शुक्रवार दिनांक १७ मे रोजी ठाण्यातील गावदेवी मैदानापासून ठाणे महानगरपालिकेवर काढण्यात येणा-या मनसेच्या मोर्चामध्ये हजारोंच्या संख्येंने सहभागी होण्याचे आवाहन केले आहे. राज ठाकरे यांनी बळीराजाला लिहिलेले पत्र पुढील प्रमाणे.
महाराष्ट्रातल्या माझ्या शेतकरी बांधवांनो, भगिनिंनो त मातांनो !
माझ्या ग्रामीण महाराष्ट्रातील शेतक-यांला चांगला भाव मिळावा यासाठी तो शेतकरी ते ग्राहक या धोरणानुसार अनेक शहरांमध्ये फळे व भाज्या याचा किमान उत्पादन व दैनंदिन खर्च भागविण्या इतपत भाव मिळावा या उद्देशाने आपल्या शहराच्या आश्रयाला येत असतात. शहरी भागात आपल्या शेतक-यांना फळे व भाज्या विक्री करताना अनेकदा भ्रष्ट राजकारणी-अधिकारी आले. तसेच त्या विभागातील गुंड प्रवृत्तीच्या लोकांचा अनेकदा नाहक त्रास सहन करावा लागतो. किंबहुना यांना हप्ता दिल्याशिवाय ते धंदाच करु शकत नाहीत. शेतकरी बाजार पेठांना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कार्यकर्ते सर्वतोपरी मदत करीत असताना केवळ श्रेय मिळू नये यासाठी भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी व गुंड अश्यावेळी प्रशासनावर दबाव आणून शेतक-यांना हुसकावून लावायचे प्रयत्न करतात.
अशाच पध्दतीने ठाण्यामध्ये रत्नागिरीचा एक शेतकरी गेल्या तीन वर्षांपासून नौपाडा विभागामध्ये आंब्याच्या हंगामामध्ये आंबे विक्रीचा व्यवसाय करीत होता. भाजपचे दहा नगरसेवक, एक जिल्हाध्यक्ष आणि असंख्य भाड्याने लोक येऊन बळजबरीने जर त्या आंबा उत्पादक शेतक-याला हटवत असतील आणि त्या शेतक-याचा लाखभर रुपयांचा माल जप्त करुन त्याच्या वार्षिक लाखभर रुपयांचे नुकसान केले जात असेल तर ते सहन करणे कितपत योग्य आहे.शेतक-यावर झालेल्या या प्रकाराला मनसेचे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र सैनिकांनी व स्थानिक लोकांनी कडवा प्रतिकार केला पण सत्तेचा दुरुपयोग करुन पालिकेची मिळालेली परवानगी रद्द करुन त्या शेतक-याला पिटाळले जाते. शेतक-यांची सध्याची अवस्था जर सरकारचा एक घटक असणा-या लोकप्रतिनिधींना समजत नसेल तर त्यांना ताळावर आणणे गरजेचे आहे असे मला वाटते. केवळ एक शेतकरी आहे म्हणून ही घटना दुर्लक्ष करणे योग्य नाही तर ही एक प्रातिनिधीक घटना आहे असे समजून त्यांना उत्तर देणे गरजेचे आहे म्हणूनच शुक्रवार दि.१७ मे, २०१९ रोजी दुपारी १.०० वाजता ठाण्याच्या गावदेवी मैदानापासून ठाणे महानगरपालिकेवर महाराष्ट्र नवनिर्माण सेना शेतक-यांचा मोर्चा काढणार आहे.
शेतक-यांना एकट्याने असो व सामूहिकपणे त्याने उत्पादित केलेला माल विकण्यासाठी सर्वतोपरी सहकार्य केले गेल पाहिजे. त्यासाठी शहरातील सरकारी कार्यालये, स्थानिक स्वराज्य संस्था यांनी जागा मिळवून दिली पाहिजे. हा काही शेतक-यांचा उध्दाराचा एकमेव मार्ग नाही पण किमान काही शेतक-यांना त्यामुळे दिलासा तर नक्कीच मिळेल. शेतक-यांच्या या मोर्चामध्ये हजारोंच्या संख्येने सहभागी होवून सहकार्य करणे व केवळ ठाणे नव्हेच राज्यातील सर्व शहरांमध्ये शेतक-यांसाठी केवळ जागाच नव्हे तर इतरही सुविधा मिळवून देण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना प्रशासनाला भाग पाडणार. बाकी प्रश्नांवर राज्यस्तरावर जे काही करायचे आहे ते मी करेनच परंतुतुर्तास याविरुध्द आपण सर्वांनी आवाज उठवलाच पाहिजे.