ज्यांचं करावं भलं तो म्हणतो माझंच खरं
मुंबई नगरी टीम
मुंबई : दुष्काळ प्रश्नावर बोलताना आज राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी राज्याचे कृषी मंत्री डॅा. अनिल बोंडे यांनी चिमटा काढला. पवार बोलण्यास उभे राहताच कृषी मंत्री बोंडे हे सभागृहाच्या बाहेर जात असतानाच पवार बोंडेंना उद्देशून म्हणाले बघा.. ज्यांचे करावं भलं तो म्हणतो माझंच खरं त्यानंतर सभागृहात एकच हशा पिकला.
सभागृहात दुष्काळावर चर्चा सुरू असताना राज्याचे कृषी मंत्री डॅां. अनिल बोंडे सदस्यांचे भाषणे ऐकून महत्वाचे टिपण घेत होते. बाळासाहेब थोरात यांच्या नंतर राष्ट्रवादीचे नेते अजित पवार हे दुष्काळ प्रश्नावर बोलण्यास उभे राहताच कृषी मंत्री डॅा. अनिल बोंडे हे सभागृहातून बाहेर जाण्यास निघाले. त्यावर पवार म्हणाले अहो… कृषी मंत्री …. ज्यांचे करावं भलं तो म्हणतो माझंच खरं, पवारांच्या या चिमट्यामुळे सभागहात एकच हशा पिकला.त्यानंतर मुख्यंमत्र्यांचे सभागृहात आगमन झाल्यावर अजित पवार यांनी दुष्काळावर बोलताना सरकारवर टीकेची झोड उठवली.राज्य सरकारने सुरुवातीपासूनच दुष्काळाबाबतचे योग्य नियोजन केले नाही. पाण्याच्या टँकरची व्यवस्था केली नाही. चारा छावण्या उभ्या करायच्या की चारा डेपो उभा करायचा हेच ठरवण्यात सरकारचा वेळ गेला. चारा छावण्या उभ्या केल्या त्या ठिकाणी आपले कार्यकर्ते कोण हे बघितले आणि त्यांनाच मदत केली असा आरोप राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी केला.
दुष्काळ प्रश्नावर बोलताना अजित पवार यांनी सरकारवर जोरदार ताशेरे ओढले. आज हवा तसा पाऊस झाला नाही त्यामुळे हिरवा चारा येईपर्यंत सरकारने चारा छावण्या बंद करू नये. पशुधन वाचवण्यासाठी १२० रुपये प्रति जनावर द्यावे अशी मागणीही त्यांनी केली. पिकविम्याबाबत शेतकऱ्यांना मोठी अडचण आहे. शेतकरी आज पिकविम्या कंपन्यांपासून वंचित राहत आहे. विमा कंपन्यांचा मोठा फायदा झाला मात्र शेतकरी विम्यापासून वंचित राहिला असा आरोपही पवार यांनी केला.तेलंगणा सरकार शेतकऱ्यांना २ हेक्टरी २० हजार रुपये देत आहेत. मग शेतक-यांना महाराष्ट्र सरकार ६ हजारच का देत आहे. तुम्ही केंद्राला सांगा कमी पडले तर राज्य सरकारकडून मदत करा मात्र शेतकऱ्यांना मदत करा कारण जगाचा पोशिंदा जगला पाहिजे असेही आवाहन पवार यांनी सरकारला केले.
२०१४ साली जलयुक्त शिवार योजना आणून त्या माध्यामातून जनतेला स्वप्न दाखवले. ५ हजार गावे प्रत्येक वर्षी दुष्काळ मुक्त करू असे मुख्यमंत्री म्हणाले होते मग आज दुष्काळ का आहे ? असा सवाल पवार यांनी मुख्यमंत्र्यांना केला. ज्या प्रमाणे ऊसाला एकरकमी रक्कम ठरली आहे तशी इतर पिकांनाही खात्रीलायक दर मिळायला हवा. शेतकऱ्यांना आम्ही समृद्ध करणार,शेतकऱ्यांना ५ हजार पेन्शन देण्याबरोबरच मोफत बी – बियाणे देवू असे यापूर्वी कृषी खाते सांभाळणारे चंद्रकांत पाटील म्हणाले होते मात्र सरकारने त्यांचेच पद काढून घेतले असा टोला चंद्रकांत पाटील यांना लगावला.