मराठा आरक्षण आंदोलनकर्त्यांवरील खटले तातडीने मागे घ्या
मुंबई नगरी टीम
मुंबई : मराठी आरक्षणसाठी शांततामय मार्गाने आंदोलन करणाऱ्या मराठा कार्यकर्यांवर दाखल केलेले खटले तातडीने मागे घ्या, अशी मागणी विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी आज विधान सभेत केली.
मराठा आरक्षणासंबंधी महत्वाची माहिती सभागृहास देतांना ते बोलत होते. ते म्हणाले की, मराठा आरक्षणाचे श्रेय लाटणाऱ्या सरकारने आंदोलन कर्त्यांवरील गुन्हे आद्याप मागे न घेतल्यामुळे सरकारचा खरा चेहरा समोर आला असून न्यायालयाच्या निर्णयाचे आम्ही स्वागत करतो असेही वडेट्टीवार म्हणाले.
मराठा आरक्षणसाठी राज्यभरात तब्बल ५६ महामोर्चे शांततामय पध्दतीने काढण्यात आले. मात्र अहिंसक पध्दतीने मोर्चे काढणाऱ्या तरूणांवर कलम ३०७, म्हणजे हाफ मर्डर, कलम ५२४ सारखे गंभीर गुन्हे नोंदवण्यात आले आहेत. राज्यात एकूण १३ हजार ६०० तरूणांवर गंभीर गुन्हे दाखल करण्यात आले, हे सर्व विद्यार्थी आहेत, त्यांच्या भविष्याचा प्रश्न आहे. त्यामुळे या सर्व तरूणांवरील सर्व गुन्हे तातडीने मागे घ्यावेत, अशी जोरदार मागणी वडेट्टीवार यांनी केली.
मराठा आरक्षणासाठी झालेल्या शांततामय आंदोलनात ज्यांना जिव गमवावा लागला आणि बलिदान दिले अशा तरूणांच्या कुटूंबियांना १० लाख रूपये आणि एसटी महामंडळात नोकरी देण्याचे ठोस आश्वासन राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले होते त्याचे काय झाले, असे विचारून वडेट्टीवार म्हणाले की, आता त्या आश्वासनाची पूर्तता करण्याची वेळ आली असून हे अधिवेशन संपण्यापूर्वी सदरील आश्वासन पूर्ण करावे असेही ते म्हणाले.