कोंढवा प्रकरणी सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा

कोंढवा प्रकरणी सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा

मुंबई नगरी टीम

मुंबई :पुण्यातील कोंढवा परिसरात संरक्षक भिंत कोसळून झालेल्या अपघातप्रकरणी दोषींवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा तसेच पुन्हा चुकीचे काम करण्याचे बिल्डरांचे धाडस होवू नये, अशी कठोर कारवाई करा  अशी मागणी राष्ट्रवादीचे विधिमंडळ पक्षनेते अजित पवार यांनी विधानसभेत केली.

पुण्याच्या कोंढवा परिसरात संरक्षक भिंत कोसळून १५ मजूर ठार झाल्याचा मुद्दा आज विरोधी पक्षाच्या सदस्यांनी विधानसभेत उपस्थित केला.अशा प्रकारची दुर्घटना घडल्यानंतर दोन-चार दिवस त्याची चर्चा होते. नंतर मात्र त्याकडे दुर्लक्ष होतं. बांधकाम व्यावसायिक दोन-तीन महिने बेपत्ता राहतात आणि पुढे काहीही होत नाही याकडे अजितदादा पवार यांनी सरकारचं लक्ष वेधले.बांधकाम करताना बिल्डर महापालिकेच्या बांधकाम नियमावलीकडे दुर्लक्ष करतात. गुंठेवारीची हजारो बांधकाम कोंढवा परिसरात सुरू आहेत. त्याठिकाणी सुरक्षेचे कुठलेही निकष कामगारांसाठी पाळले गेलेले नाहीत. कामगारांची बांधकाम व्यावसायिकाने नोंदच ठेवली नसल्याने त्यांना मदत मिळण्यातही अडचणी येत आहे. बिल्डर करोडो रुपये कमवतात आणि संरक्षक भिंत कमकुवत बांधतात, याप्रकरणात जे कुणी बिल्डर असतील त्यांच्यावर कठोर कारवाई करा अशी मागणीही पवार यांनी  केली.हे काम सुरू असताना सोसायटीने महापालिका आणि पोलिसांकडे तक्रार केली होती परंतु त्यांनी दुर्लक्ष केल्याचे  पवार यांनी  सांगितले. कोंढवा दुर्घटनेतील जबाबदार बिल्डरला काळ्या यादीत टाकण्याची मागणी राष्ट्रवादीचे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते  दिलीप वळसे पाटील यांनी केली. तसेच हे बांधकाम पुढे करण्याची परवानगी देवू नये अशी मागणीही त्यांनी केली. कोंढवा परिसरात बेकायदेशीर बांधकाम होत आहेत. शिवाय नियमांचे उल्लंघन करून सुरू असलेल्या बांधकामांना पायबंद घाला अशी मागणीही दिलीप वळसे-पाटील यांनी केली.

Previous articleपुरंदर तालुक्यात जलयुक्त शिवार कामात २०० कोटीचा भ्रष्टाचार
Next articleमराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळण्यासाठी केंद्राला सुधारित प्रस्ताव पाठवा