शेतकऱ्यांचे बळी घेऊन वृक्षरोपणाचे लक्ष्य साध्य करणार काय
मुंबई नगरी टीम
मुंबई : शेतकऱ्यांचे बळी घेऊन वृक्षरोपणाचे तथाकथीत लक्ष्य सरकारला साध्य करायचे आहे काय? असा खडा सवाल विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी आज येथे केला. बी १ या शासकिय निवासस्थानी ते पत्रकारांसोबत बोलत होते. वरोरा येथील तरूण शेतकऱ्याने वन अधिकाऱ्यांच्या धमकीला घाबरून विषारी किटकनाशक प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केलेल्या प्रकरणाची माहिती देतांना त्यांनी हा सवाल केला.
ते म्हणाले, की वरोरा तालुक्यातील चिनोरा या गावातील तरूण शेतकरी विलास आनंदराव देऊळकर यांच्या शेतात सध्या पीक आहे. मात्र वरोरा वनपरिक्षेत्र अधिकारी कार्यालयातील वन अधिकाऱ्यांनी कोणतीही नोटीस न देता विलास यांच्या शेतात जाऊन त्यांना पिकाखालील शेती रिकामी करण्यासाठी धमकावले. जमिन खाली केली नाही तर जबरदस्तीने वृक्षारोपण करू आणि पोलिसात तक्रारही देऊ असा दम दिला. अधिकाऱ्यांच्या धमकावणीला घाबरून त्याने किटकनाशक घेऊन आज जीवन संपवण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्या वन अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करा, अशी मागणी वडेट्टीवार यांनी केली.
अस्वस्थ अवस्थेत त्याला आजूबाजूच्या शेतकऱ्यांनी मदत करून प्रथम वरोरा येथील उपजिल्हा रूग्णालयात आणि नंतर चंद्रपूरच्या शासकिय महाविद्यालयात दाखल केले. त्यामुळे आज तो वाचला आहे. मात्र अधिकाऱ्यांच्या आडून सरकार शेतकऱ्यांवर अरेरावी करत आहे, असा आरोप करून वडेट्टीवार म्हणाले की, शासकिय अधिकाऱ्यांवर लादलेली वृक्षरोपणाची आकडेवारी पूर्ण करण्यासाठी सरकार शेतकऱ्यांचा बळी घेणार आहे काय याचे उत्तर शासनाने दिले पाहिजे असेही ते म्हणाले.